अनुभूती…दैवी कणाची!

Anubhuti

(8 जुलै 2012 रोजी लिहिलेला लेख)

खरोखर देव आहे काय? उत्तर येतं, माहिती नाही’. अनेक श्रद्धाळू सुद्धा आयुष्यातील अडचणींच्यावेळी हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारत असतात. श्रद्धा असतेच, पण ती कधी डळमळतेही. शेवटी माणूसच ना तो? शेवटी एकच क्रोसिन सर्वांवर सारखाच परिणाम करीत नाही. कधी ती ताप बरा करते, तर कधी ऍलर्जीला कारणीभूत ठरते. असे असले तरी देव जितका चर्चेत राहतो, तसे विज्ञानाच्या मात्र नशिबी नाही. त्यामुळे या देशात म्हणा किंवा जगात देव खरा की विज्ञान ही चर्चा कायमच होत राहणार. या चर्चेला अंत असू शकत नाही. उा अगदी देव पृथ्वीवर पुन्हा अवतरला तरी हा देव नाहीच, असे म्हणणार्‍यांची संख्या दिसेलच. जे भौतिकशास्त्र आपण शाळेत शिकलो, त्यात न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन या तीन कणांनाच आजवर मान्यता होती. पण, भौतिकशास्त्राच्या पुस्तकात जोड ायला लावणार्‍या या बदलांनी ख्यातनाम ब्रिटीश भौतिकशास्त्री पीटर हिग्ज आणि भारतीय सत्येंद्रनाथ बोस यांच्या हिग्ज बोसन’ सिद्धांतावर शिक्कामोर्तब केले आहे. एक चौथा कणही अस्तित्त्वात आहे आणि तोच विश्वनिर्मितीचा कर्ता आहे, याच्याशी निगडित हा संपूर्ण अभ्यास आहे. त्यालाच सब ऍटोमिक पार्टिकल’ असे आता संबोधले जाईल.


देव आणि विज्ञानाचा मागोवा घेण्याचा आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केला. असाच एक प्रयत्न प्रो. पीटर हिग्ज यांनी प्रारंभ केला, तेव्हा ते ३४ वर्षांचे होते. आज ते ९३ वर्षांचे आहेत. याचाच अर्थ त्यांच्या मनात आलेला प्रश्न जवळजवळ ६० वर्ष जुना आहे. एडिनबर्ग विापीठात असताना त्यांनी त्यांच्या मनातील शंका बोलून दाखविली, तेव्हा अख्ख्या जगाने त्यांना मुर्खात काढले. त्यांना मुलभूत भौतिकशास्त्रच समजलेले नाही, असा आरोप करायलाही इतर भौतिकशास्त्री विसरले नाही. त्यांचा शास्त्रअभ्यास त्यांना खुणावत तर होताच. पण, ईश्वरी रुपाने उपस्थित असलेली इच्छाशक्ती आणि जगाशी लढण्याची प्रवृत्ती त्यांना आत्मिक बळ देत होती. तसे त्या प्रश्नाने अनेकांना खुणावले असेलही. पण त्यांचे कदाचित आत्मिक बळ कमी पडले असेल. अखेर आज तो सिद्धांत काळाच्या कसोटीवर खरा उतरला आहे.


ईश्वरत्त्वाचा प्रवास असो की, विज्ञानाचा प्रवास या दोन्ही प्रवासांची एक समान गती आहे. पण, त्यांची अनुभूती मात्र वेगवेगळी आहे. बदलत्या काळात विज्ञानाचा झपाट्याने प्रवास झाला आणि त्याने ईश्वरत्त्वावर अनेक प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न त्याने केला. ईशरत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून विज्ञान मोठे होणे शक्य नव्हते. अगदी तसेच ईश्वरत्त्वच म्हणजेच सारे काही, असे सांगून विज्ञानाला संकुचित ठरवूनही काहीच साध्य झाले नसते. मानवी जीवनात या दोहोंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दोघांचेही यश संतुलन, संयमावर आधारित आहे. या दोहोंचा परस्परांवरचा अतिरेक मानवाला विनाशाकडेच नेणार, हे निश्चित आहे. परीक्षेत यश मिळविण्यासाठी अभ्यास करावाच लागतो. निव्वळ आशादायी भाव प्रगट करून उत्तीर्ण होता येत नाही. यातील अभ्यास हे विज्ञान आहे, तर सकारात्मक भाव हे देवत्त्व आहे. आज विमान, टेलिफोन, भ्रमणध्वनी, इंटरनेट असे अनेक विज्ञानाचे विषय आहेत. फार पूर्वी अध्यात्मातही हे विषय होतेच. पुराणांमध्ये याचे आनुषंगिक संदर्भ तुम्हाला सापडतील. संत ज्ञानेश्वरांनी चालविलेली भींत, पुष्पक विमान, दोन संतांचा आपसांतील तादात्म्यामुळे परस्परांशी झालेला संवाद असेल, असे अनेक विषय आजच्या वैज्ञानिक शोधाचे पौराणिक काळातील दाखलेच म्हणावे लागतील.


देव नाही आणि विज्ञान आहे, असा युक्तिवाद करताना प्रामुख्याने देवाच्या अस्तित्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातो. देव डोळ्याने दिसत नाही आणि विज्ञान डोळ्याने पाहता येते. जनसामान्यांपासून देव दूर जाण्यालाही बरीच कारणे आहेत. देवत्त्वाचा आनंद घेण्यापेक्षा त्याबद्दल मनात दहशत निर्माण करण्याचाच सातत्याने प्रयत्न झाला. अमूक केले नाही, तर अमूक वाईट होईल, असे जितकेवेळा सांगण्यात आले, तितक्यांदा थोडक्याही भक्तीने मोठा फायदा होतो, हे सांगणे श्रेयस्कर ठरले असते.


वेद, उपनिषदे आणि पुराण हे आज अभ्यासक्रमात नाहीत. अर्थशास्त्रापासून ते तत्त्वज्ञानापर्यंत सारेच विषय शिकविण्यात येतात, तेव्हा त्यात पाश्चिमात्य अभ्यासकांचे दाखले दिलेले असतात. ४ जुलैच्या दैवीकणांच्या शोधावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर एका शास्त्रज्ञाने दिलेली प्रतिक्रिया मोठी बोलकी होती. विज्ञान आणि अध्यात्म यात केवळ एका रेषेचे अंतर आहे. एका समान रेषेवर उभे राहिले आणि दोन्हीकडे पाहिले, तर एका बाजुला विज्ञान उभे आहे आणि दुसर्‍या बाजूला अध्यात्म अर्थात देव उभा आहे. आता कदाचित जगाच्या मान्यतेनंतर दैवीतत्त्व (देव नव्हे) मान्य केले जाईल. वेद, उपनिषद आणि पुराणांचा अभ्यास तसाही फार पुढे नेण्यात आलाच नाही. काही निवडक ग्रंथांमध्ये आणि निवडक व्यक्तींपुरता तो मर्यादित ठेवण्यात आला. कालांतराने काही स्वघोषित अवतारी पुरूष आले आणि तेच जणू काही अध्यात्मिक जीवनाचे अंग बनले. चमत्काराच्या गप्पा अधिक झाल्या आणि त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटनांच्या जन्मदात्या ठरल्या. अगदी थोडक्यात सांगायचे झाल्यास ईश्वरत्त्वाचा प्रवास वैयक्तिक स्वार्थाकडे सुरू होता आणि विज्ञानाचा प्रवास मानवी कल्याणासाठी होत गेला. त्यातून प्राणरक्षक औषधी, भौतिक सुखाची साधनं, जीवनशैली सुलभ करणारी यंत्र तयार झाली. अशा जीवनशैलीत अडकलेला माणूस हा केवळ वैयक्तिक सुखासाठी ईश्वराची आराधना करू लागला. विज्ञानाने तयार केलेली साधनं आम्हाला मिळू दे, हीच त्याची देवाकडे मागणी राहू लागली. हा क्रम संपण्याचे अजूनही नाव नाही.


बुवाबाजी, कर्मकांडांच्या आग्रहाने एकेकाळी जितका उच्छाद मांडला होता, अगदी त्याचप्रमाणे विज्ञानाचा मानवी कल्याणाचा प्रवास पुढच्या टप्प्यात मानवी विनाशाकडेही होऊ लागला आहे. वैकीय सोयी अफाट झाल्या. पण, त्या भृणहत्येसाठी आणि आमिर खान म्हणतो, तसे व्यवसायासाठीही वापरल्या जाऊ लागल्या आहेत. एका रेषेवर उभे राहून डावीकडे केवळ विज्ञानावर नजर ठेवल्याने उजवीकडचा ईश्वर दृष्टीआड झाला. ईश्वरत्त्व हे नैतिकतेचे, आचार-विचारांचे, जगण्याचे, जीवनाच्या कलेचे शास्त्र आहे, हे विस्मरणात गेले आहे. विज्ञान हे बहिरंग असेल तर ईश्वरत्त्व हे अंतरंग आहे. वेदांवर आधारित शिक्षणप्रणाली लोप पावली आणि ईश्वरत्त्व हळूहळू कमी होत गेले. ब्रह्मांडाचा शोध लावण्यासाठी अनेकांनी हिमालयात उपासना केली, ईश्वराची जागा कोणती? तो राहतो कुठे? काय करतो? त्याची कृपा केव्हा होते आणि अवकृपा केव्हा होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न अनेक संतांनी केला आणि त्यांना गवसलेला मार्ग त्यांनी समाजापुढे दाखविण्याचा प्रयत्नही त्या-त्या काळात केला. अध्यात्माचा सामाजिक आशय पटवून देण्यात आला, तेव्हा अध्यात्माशी लोकांची जवळीक वाढली. आज अध्यात्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो आहे. व्यक्तिमत्त्व विकास, जीवन जगण्याची कला शिकविली जाते आहे. हे शिक्षण पूर्णतः अध्यात्मिक शिक्षण आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत गजानन महाराज यांच्या जीवनातील सामाजिक आशयाचा अभ्यास केला तर अध्यात्म समजायला अधिक सोपे होईल.


चार वेद, पुराण, उपनिषदांतून अध्यात्म शिकविले गेले असते, तर कदाचित विज्ञान आणि देव यांची फारकत कधीही झाली नसती. हिंदू धर्मातील हे मुलभूत ग्रंथ संपूर्णतः वैज्ञानिक आहेत. ती फारकतच विश्वाच्या अधःपतनाला कारणीभूत ठरते आहे. विज्ञान हेही एक अध्यात्म आहे. त्याचे काही नियम आणि सिद्धांत आहेत. नियम आणि सिद्धांतालाच शास्त्र म्हणत असतील तर मग अध्यात्म हेही एकप्रकारचे विज्ञानच आहे. अध्यात्मशास्त्र असा शब्दप्रयोगही अजीबात चुकीचा नाही. वेदांमधून आलेले आयुर्वेद हे जसे शास्त्र आहे, तसेच ज्योतिष्य हे सुद्धा शास्त्रच ठरते. आयुर्वेदांतील औषधी आणि त्यांचे गुण डोळ्याने दिसतात. ज्योतिषशास्त्राचे परिणाम अचूक अभ्यासानंतर वर्तविता येतात. प्रत्येक बाबतीत दोन निकष लागत असतात. एक दृश्य असते आणि दुसरी अनुभूती. मुलाला आई जवळ घेते, तेव्हा तिचे ते प्रेम दिसत असते आणि जेव्हा मुलगा तिच्याजवळ नसतो, तेव्हाही ती त्याच्यावर प्रेमच करत असते. पहिल्या प्रकारातील प्रेम हे दृश्य स्वरूपाचे आहे आणि दुसर्‍यात ती अनुभूती आहे. पुस्तक वाचणे हा अभ्यास आहे आणि पुस्तकातील डोक्यात शिरणे ही त्या विषयाची तुम्हाला झालेली अनुभूती आहे. औषध घेणे हे दृश्य आहे, औषधी गुण येणे ही अनुभूती आहे. मंदिरात जाऊन किंवा मनमंदिरातील ईश्वरालाही स्मरणे हे दृश्य आहे आणि त्यातून मिळणारी मनःशांती ही अनुभूती आहे. आजच्या युगात तर दृश्य आणि अनुभूतीतील अंतर ओळखणे अतिशय आवश्यक आहे. एखादी व्यक्ती तुमचे खूप कौतूक करते आहे, हे दृश्य आहे. पण, तिच्या मनात तुमच्याबद्दल कोणते भाव आहेत, हे ओळखता येणे, ही अनुभूती आहे. शास्त्रज्ञांनी न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन ओळखले असले तरी चौथ्या प्रकारातील कण हे अनुभूतीचेच आहेत. ब्रम्हांडाचा शोध अजूनही लागलेला नाही. विश्वाच्या रचनेचा वेध अध्यात्म आणि विज्ञान हे याही पुढील काळात घेणारच आहेत. परवाचा शोध हा या प्रवासातील एक टप्पा तेवढा ठरावा. या शोधाचा प्रवास हा पुन्हा एका समान रेषेतूनच होणार आहे. परस्परांच्या विद्वेषातून या शोधातील अंतर वाढविण्यापेक्षा यातील मानवी रेषा पुसणे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे.

नेमके काय सापडले?
ङङ्गयुरोपियन कौन्सिल फॉर न्यूक्लिअर रिसर्च’ या संस्थेने केलेल्या शोधात अणुच्या एका चौथ्या कणाचे अस्तित्त्व मान्य करण्यात आले आहे. हिंग्ज बोसनच्या सिद्धांताला त्यामुळे पुष्टी मिळते.

शोधाचा नेमका अर्थ काय?
हिंग्ज बोसनच्या शोधामुळे काही मुलभूत कण अस्तित्त्वात आहेत आणि त्यामुळे ब्रह्मांडाची निर्मिती झाली, याला बळकटी मिळते. ब्रह्मांड नसते, तर उर्वरित कणांनी ग्रह, तारे तयार झाले नसते. त्यासाठी आवश्यक असलेली जागा या मुलभूत कणांनी निर्माण केली. भौतिकशास्त्राच्या सिद्धांतांमध्ये जो हरवलेला दुवा होता, तो हाच आहे, याला या शोधामुळे बळकटी मिळाली.

याचा वापर काय?
आजघडीला या शोधाचा कुठेही लगेचच वापर होणार नाही. ब्रह्मांडातील रहस्याचा शोध घेणे आणि अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे शोधणे, एवढाच त्याचा हेतू होता. यातून विज्ञानाचा नेमका अर्थ समजून घेण्याचाही उद्देश होता. हा असा एक मुलभूत शोध आहे, ज्यातून अनेक नवीन रहस्य उलगडतील, असा तज्ञांचा दावा आहे.

भारतीय संदर्भ
या प्रयोगाला हिग्ज बोसन असे जे नाव पडले, ते अल्बर्ट आईनस्टाईन यांच्यासोबत काम करणार्‍या सत्येंद्रनाथ बोस यांच्यामुळे. या शोधात जे पाच भारतीय होते, त्यात प्रा. सुनंदा बॅनर्जी, प्रा. सत्यकी भट्टाचार्य, प्रा. सुचंद्रा दत्ता, प्रा. सुबीर सरकार आणि प्रा. मनोज सरन यांचा समावेश होता.