नंबर दोनचा प्रमेय

(ऑगस्ट 2012 मध्ये लिहिलेला लेख)

एक, दोन, तीन, चार… अशी कितीही गणती करीत राहिले, तरी ती संपणार नाही. अवघ्या जगात आज गणितंच मांडली जातात. कुणाला श्रीमंतीच्या व्याख्येला गणितात बसवायचं असतं, तर कुणाला पोटाची खळगी भरण्यासाठी गणित मांडावं लागतं. माणूस आनंदात असला की तारखा मोजतो आणि दुःखात असला की वर्षं! आनंदात त्याला प्रत्येक दिवस साजरा करावासा वाटतो आणि दुःखात वर्ष पटकन सरावं असं वाटत राहतं. खरं तर आयुष्यही एक प्रकारचं गणितच असतं. अनेकांना ते गणित जमतं, अनेकांचं फसतं. गणितात जरी दोन अधिक दोन चार होत असले, तरी आयुष्याच्या गणितात कधी त्याचा अर्थ चार असतो, तर कधी पाच, कधी सहा. आयुष्यातील टप्प्यानुरूप तो बदलत जातो. गणितावर ज्यांची श्रद्धा असते आणि त्याला सबुरीची जोड असते, त्यांचंच गणित जमतं असंही म्हटलं जातं. पण, आकड्यांच्या खेळातच वन टू का फोर’ करणारेही असतातच.


आता हेच पाहा ना. केंद्रात डॉ. मनमोहनसिंग हे क्रमांक एकवर होते आणि प्रणव मुखर्जी क्रमांक दोनवर. मुखर्जींच्या डोक्यात कायम क्रमांक एकचा विषय राहत असे. पण, सत्तेच्या गणितात ते क्रमांक एकवर कधीही पोहोचू शकले नाही. नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच होते. आज ते राष्ट्रपतींच्या खुर्चीत आसीन झाले. आता कायदेशीरदृष्ट्या ते क्रमांक एकवर गेले आहेत. पंतप्रधान हे राजकीयदृष्ट्या क्रमांक एक असले, तरी संवैधानिकदृष्ट्या राष्ट्रपती हे क्रमांक एकवर आहेत. पंतप्रधानांच्या परराष्ट्रभेटी, देशातील महत्त्वाच्या घडामोडी, अधिसूचना, अध्यादेश यासाठी आता याच पंतप्रधानांना त्यांच्या मंत्रिमंडळातील तत्कालीन क्रमांक दोनच्या मंत्र्याकडे जावे लागणार आहे. गणिताने आपली किमया साधली आहे.


केंद्रातील गणिताच्या याच प्रमेयाने (थेरम) अन्य घडामोडींना जन्म दिला आहे. मुखर्जी राष्ट्रपती झाले आणि मंत्रिमंडळात ङङ्गनंबर टू’चा वाद प्रारंभ झाला. ए. के. ऍण्टोनी हे संरक्षणमंत्री असल्याने स्वाभाविकच नंबर टू’साठी त्यांचा दावा प्रबळ होता. प्रफुल्ल पटेल कितीही ओरडून अन्य विषय सांगत असले, तरी मूळ वाद हा नंबर टू’चा आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यातच सुशीलकुमार शिंदे सभागृहातील नेते होणार, राहुल गांधी मंत्रिमंडळात येणार, अशा बातम्यांनी पवारांना अधिक अस्वस्थ केले. या मांदियाळीत आपण चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर राहू, ही बाबच त्यांना अस्वस्थ करीत होती. शरद पवार यांच्याकडे पाहता त्यांना असे वाटणे स्वाभाविकही आहे. पण, ही परिस्थितीसुद्धा त्यांनीच निर्माण केली, हेही नाकारून चालणार नाही. शरद पवार काँग्रेसमध्येच असते, तर आज ते नंबर टू’ राहिले असते, यात शंका नाही. कदाचित डॉ. मनमोहनसिंग यांच्या जागीही ते दिसले असते, तर नवल नव्हते. प्रारंभीपासूनच ङङ्गनंबर वन’ची त्यांना इतकी घाई झाली होती की, त्या उठाठेवीत त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. तिसर्‍या आघाडीला सत्तेचे स्वप्न पडत होते. पण, फासे पुन्हा फिरले. सोनिया गांधी पंतप्रधान होताहेत, हे लक्षात येताच त्यांनी बंड केले. पवार साधारणतः कोणत्याही गोष्टीने व्यथित होत नाहीत. पण, नंबरगेम’ त्यांना कायम अस्वस्थ करतो. त्यांच्या आयुष्यातील पहिले बंड राज्यात ङङ्गनंबर वन’ होण्यासाठी होते आणि दुसरे बंड केंद्रात नंबर वन’ होण्यासाठी. हे त्यांचे तिसरे बंड म्हणायचे झाल्यास तेही नंबर गेम’साठीच.


पवारांनी याचे भान ठेवणे आवश्यक आहे की, आता आपण काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे केंद्रातील सत्तेत नंबर टू’चे पद काँग्रेस पक्षाकडेच जाणार. पक्षीय चौकट मोडून नंबर टू’ आणि नंबर थ्री’ ठरवायची पाळी आली, तर इतरही अनेक नेते या पदावर दावा करतील. तसेही केवळ पंतप्रधानांच्या बाजूला कोण बसतो, यावरून केंद्रातील मंत्र्यांचे क्रम ठरत नसतात. थोडी धुसफूस करून तात्कालिक यश पदरी पाडून घेणे, एवढेच आता पवारांच्या हाती उरले आहे. एखाद मंत्रिपद मिळवून घेणे किंवा निर्णयप्रक्रियेतील सहभाग वाढवून घेणे यासाठीचा हा आटापिटा असू शकतो. राष्ट्रवादीचा महाराष्ट्राशिवाय अन्य राज्यात जनाधार नाही. खासदारांची संख्या नगण्य आहे. त्या आधारावर फार ब्लॅकमेल’ करण्याची त्यांची ताकद नाही. सपा, तृणमूल, द्रमुक हे त्या तुलनेने कितीतरी मोठे पक्ष आहेत. शिवाय, पवारांना संख्याबळाच्या आधारावर नंबर टू’ म्हणायचे ठरविले, तर ते काँग्रेस पक्षासाठी आत्महत्या केल्यासारखे ठरेल. महाराष्ट्रातील सरकार राष्ट्रवादीच्या भरवशावर आहे, ही काय ती त्यांची मोठी ताकद. पवारांनी एक डाव टाकून पाहिला, तो दगड हवेत जाणार, यात शंका नाही. त्यांच्या दोन-चार मागण्या फारतर मान्य होऊ शकतात. नंबर टू’ किंवा नंबर वन’ हा पवारांच्या स्वप्नातीलच विषय ठरावा, असे आज नाही, तर येणार्‍या काळातील राजकीय समीकरणे सांगत आहेत. पवारांना पंतप्रधानपद आता केवळ काँग्रेसमध्ये परत जाण्यातून किंवा तिसर्‍या आघाडीचे सरकार स्थापन करण्यातूनच प्राप्त होऊ शकते आणि या दोन्ही शक्यता जवळजवळ धूसर आहेत.