नोकरी करायची कशी?

(25 जून 2012 रोजी लिहिलेला लेख)

नोकरीत खूप प्रामाणिकपणे मेहनत करणे अनेकदा अंगावर शेकत असते. याचा अनुभव आयुष्यात अनेक जण घेत असतात. साधारणपणे कामचलावू पद्धतीने, प्रवाहाशी जुळवून घेत मार्गोत्क्रमण करणारे अनेक लोक असतात. त्यांच्या नोकरीचा कालखंड अतिशय चांगला जातो. सन्मानाने निवृत्त होण्याची संधी त्यांना मिळते. पण, कर्तव्य पार पाडण्यासाठी जोखीम घेत, व्यवस्थेशी शत्रूता पत्करत, प्रामाणिकता दाखविणारे थोडकेच असतात. मुंबईचे साहाय्यक पोलिस आयुक्त वसंत ढोबळे सध्या नेमक्या याच मानसिकतेतून वाटचाल करीत आहेत. बार, डान्सबार, पबवर एका पाठोपाठ एक धाडी टाकत असलेले ढोबळे आज मुंबईत टीकेचे लक्ष्य ठरले आहेत. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त अरूप पटनाईक हे त्यांच्या पाठीशी आहेत, एवढे एकच त्यांचे भाग्य. अन्यथा आज ते अन्य कुठेतरी बदलीच्या निमित्ताने काम करताना आढळले असते.

खरे तर आज तरुण पिढी पूर्णतः नशेच्या आहारी गेली असताना तो राजकारण्यांच्या चिंतेचा विषय असायला हवा. प्रेमदिनाला कडाडून विरोध करीत शिवसैनिक रस्त्यावर उतरतात. संस्कृतीच्या ठेकेदाराच्या भूमिकेत वावरतात. पण, सध्या कुंपणच शेत खायला निघाल्याची मुंबईत अवस्था आहे. सांताक्रूझमधील संगीत बार बाळासाहेब ठाकरेंचा नातू निहारच्या नावे, कांदिवलीतील सावली बार शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती यांच्या नावे आहे. बांद्र्यातील झारा रेस्टॉरंट हा आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांचा मुलगा क्षितिज याच्या नावे आहे. राजकारणातील दिग्गज या व्यवसायात असताना खरे तर त्यांना जनतेला शहाणपणा सांगण्याचा कोणताही अधिकार नाही. पण, आज त्यांच्या बारवर धाड पडताच वसंत ढोबळे हे त्यांच्या डोळ्यात खुपू लागले आहेत.


मानवाधिकार संघटना नक्षलवाांच्या मदतीला धावाव्या, तशा व्यक्तिस्वातंत्र्यवाांनी ढोबळेंच्या विरोधात मुंबईत मोर्चे आयोजित केले आहेत. एकिकडे कायदा आणि सुव्यवस्था राखत नाही म्हणून न्यायालयाचे ताशेरे ऐकायचे आणि दुसरीकडे कारवाई केली म्हणून या राजकीय नेत्यांच्या रूपाने रोषाला सामोरे जायचे, असे दुहेरी जगणे पोलिसांच्या वाट्याला येत असते. फार कमी अधिकारी त्या दबावाला सामोरे जातात आणि बहुतेक थातुरमातुर काम करून एक तारखेला पगार घेण्याला आपली प्राथमिकता देतात. पोलिस दलात तर अशा पगार घेणार्‍यांची आणि दहा-पंधरा रुपयांसाठीही चटकन भ्रष्टाचारासाठी राजी होणार्‍यांची अजीबात कमतरता नाही. अशात एखादा अधिकारी हिमतीने पुढे जातो आहे, तर त्याचे हात बळकट केले पाहिजे. जनतेचा रेटा त्याच्या बाजूने उभा केला पाहिजे. पण, जनताही गप्प राहून मुकाटपणे हे सर्व सहन करीत असते. न्याय प्रत्येकाला हवा असतो. पण, तो राजनयिक मार्गांनी हवा असतो. आम्ही बोलणार नाही, प्रामाणिक अधिकार्‍याच्या मागे उभे राहणार नाही, भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात पेटून उठणार नाही, अशात सारे काही सहन करणारा अधिकारी मात्र आम्हाला हवा असतो. आज ढोबळे त्याच मानसिकतेतून जात आहेत. भाजपाचे आमदार प्रकाश मेहता यांचा मुलगा अखिलेश यालाही जुगार खेळताना याच ढोबळेंनी पकडले होते.


चांगल्या अधिकार्‍यांना क्षणोक्षणी असाच विरोध झाला आणि त्यांनीही पगारापुरते काम या मानसिकतेतून काम करणे प्रारंभ केले, तर काय करायचे, हा प्रश्नही आमच्या मनात येऊ नये? ढोबळे राजकारण्यांच्या पदराला हात घालत आहेत, तर त्यांचे हात बळकट करणे हे सर्वांचे काम आहे. अशा अधिकार्‍यांचा गौरव केला पाहिजे. त्यांना माहितीच्या रूपाने मदत केली पाहिजे. सरकारी व्यवस्थेला आणि त्यामुळे प्रशासनाला लागलेली कीड साफ करायची असेल, तर अशा अधिकार्‍यांचे हात बळकट करावे लागतील. टी. एन. शेषन, किरण बेदी, गो. रा. खैरनार, अरविंद इनामदार यांनी आपापल्या काळात जे योगदान दिले, त्यामुळेच आज त्या संस्था जनतेला ठाऊक झाल्या, हे विसरता येणार नाही.