पहिला पाऊस…

पावसाचं असंच असतं. माणूस विज्ञानवादी असावा की नसावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण, काही विषयांना विज्ञानाच्या निकषात बांधता येत नाही, हेही तितकंच खरं. िकबहूना कुठे विज्ञानाचे निकष लावावे आणि कुठे लावू नयेत, याचं भान पाळता आलं की, निराशा पदरी पडत नाही.


आता हेच बघा ना, यंदा मान्सून लवकर येणार, अशी जोरदार भविष्यवाणी झाली. भविष्य कसले, हवामान खात्याने वैज्ञानिक अभ्यासातून काढलेला तो निष्कर्ष होता. हवामान खातं, उपग्रहानं काढलेलं छायाचित्र, दररोजचे अंदाज यावर नजर खिळली. रोज एकदा तरी भारताच्या नकाशावर मान्सूनची निळी रेख कुठवर आली, हे पाहणं हा जणू छंदच जडलेला. जास्त लोक डोळे लावून बसले की, येणारा पाहुणाही उशीरा येतो असं म्हणतात. कदाचित यामुळेच नेते कार्यक्रमांना उशीरा येत असावे. भारताचं हवामान खातं दिवसाला चार वेळा उपग्रहांच्या छायाचित्रांचा अभ्यास करते आणि त्यावरून पुढच्या तीन ते चार दिवसांचे आपले निष्कर्षयुक्त अंदाज जाहीर करत असते.


केरळात तो 1 जूनला येणार होता. 31 मेपर्यंत परिस्थितीची वाट पाहण्यात आली. अचानक कोणतं तरी वादळ आलं आणि त्याच्या आगमनाची वाट चुकली. या वादळांना निरनिराळी नावं देण्याचा प्रघात आहे. आता 4 ते 5 जूनपर्यंत तो केरळात येईल, असं सांगितलं जाऊ लागलं. नागपुरात मात्र, मान्सूनपूर्व घडामोडींनी वेग घेतला होता. कमालीचं तापमान, अंगाची लाहीलाही, प्रचंड उकाडा वगैरे. अशात पहिला पाऊस (अर्थातच मान्सूनपूर्व) शुक्रवारी (1 जून) अर्धा तास कोसळला आणि एकदम वातावरण बदलून गेलं. मान्सूनपूर्व पावसाची हजेरी ही मान्सूनच्या आगमनाची टक-टक असते आणि म्हणून त्याचंही महत्त्व मोठं असतं.


असं बरेचदा का होतं की, हवामान खातं अंदाज वर्तवितं आणि तो खोटा ठरतो. अनेक लोकांसाठी हा थट्टामस्करीचाही विषय असतो. हवामान खात्याने पाऊस पडेल असं सांगितलं की, तो पडत नाही आणि हवामान कोरडं राहील, असं म्हटलं की नेमका पाऊस येतो. शुक्रवारचा नागपूरचा अंदाज हवामान कोरडं राहण्याचाच होता. याच कारण एकच की निसर्गाला नेमकं विज्ञानात बांधता येत नाही. तो अवलिया आहे. तो क्षणात बदलणारा आहे. तो शिघ्रकोपीही आहे आणि तितकाच दयाळूही आहे. पण, मग हवामान खातं असावं की नसावं, हा प्रश्न आपोआप अनेकांच्या मनात येतो. हे खातं असावंच. कारण, अनेक चक्रीवादळं, भरती-ओहोटी, मुसळधार वृष्टी याचे अंदाज हवामान खात्याकडून दिले जात असतात. खरं तर हवामान खातं, हे आरोग्य विम्यासारखं काम करीत असतं. आपण कोणत्या वर्षी आजारी पडणार आहोत, हे कुणालाही ठावूक नसतं. पण, दरवर्षी आरोग्य विम्याचे हप्ते भरले जातातच. विम्याचा अवघा व्यवसाय याच एका गृहितकावर आधारित आहे. ते यासाठीच कारण, ज्या कोणत्या वर्षी आपण आजारी पडू, तेव्हा नेमकी मदत सुरक्षित असते. आज पाऊस पडेल काय िंकवा उद्या, त्याचा अंदाज चुकल्यानं फारसा फरक पडत नसतो. पण, एखाद्या मोठ्या नैसर्गिक संकटाचा अंदाज त्यातून बांधता येतो. दहापैकी कदाचित पाचच संकटं या अंदाजांमुळे टाळता येतील, पण ते आवश्यक असतं. हवामान खात्याचं योगदान म्हणूनच मोठं आहे.


हा विषय शिकायला फार कठीण आहे असंही नाही. हवामान खात्याचे एक संकेतस्थळ आहे. ‘आयएमडी डॉट जीओव्ही डॉट इन’. या संकेतस्थळावर गेलं की अनेक लहान-लहान गोष्टींतून आपल्याला बरंच काही शिकता येतं. हवामानाचा अंदाज वर्तविणं हे काम शास्त्रज्ञांचं असलं तरी घरबसल्या काही प्रयोग करायला काय हरकत आहे? हवामान खातं या संकेतस्थळाच्या माध्यमातून दिवसांतून चारदा आपले अंदाज सांगत असते. सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि रात्री अशी चारवेळा ही माहिती प्रसूत केली जाते. त्यात आगामी तीन दिवसांचे अंदाज दिलेले असतात. भारताच्या नकाशाद्वारे मान्सूनची वाटचाल कुठपर्यंत झाली, हे दर्शविणारा दररोजचा नकाशा दिलेला असतो. या संकेतस्थळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कल्पना-1 या उपग्रहामार्फत टिपलेले छायाचित्र. उपग्रहांची छायाचित्र घरबसल्या कोणतेही शुल्क न देता आपल्याला पाहता येतात. त्यात भारताच्या कोणत्या भागावर सध्या ढग आहेत, कुठे पावसाची शक्यता आहे, हे नेमकं ओळखता येतं. या उपग्रहांच्या चित्रांचे अॅनिमेशन तर नेमकं चित्र उभं करतं. अर्थात पुन्हा तेच शास्त्र म्हणून शिकायला हरकत काय आहे? पंचांगातही नक्षत्रपरत्त्वे अंदाज दिलेले असतात. कोणत्या नक्षत्राचं वाहन कोणतं आहे आणि त्या वाहनाचा स्वभाव काय आहे, हे पाहून अनेक अंदाज ज्योतिषशास्त्री काढत असतात. आता या दोन्ही शास्त्रांचा संगम साधता आला, तर ते सर्वार्थाने योग्य ठरेल. ज्यांना काही तरी नवीन शिकण्याची आवड आहे, त्यांनी पंचाग आणि हवामान खात्याचे संकेतस्थळ याचा मेळ साधून अभ्यास करायला हरकत नाही. कदाचित यातून काही तरी नेमके हाती लागेल.