फेसबुक आणि कृष्ण


(19 डिसेंबर 2011 रोजी प्रकाशित लेख)
अन्य देशात तयार झालेल्या फेसबुकच्या वापरावर नियंत्रण आणण्याची भाषा फक्त केंद्र सरकार करत नाही तोच अवघं भारतीय समाजमन ढवळून निघतं आणि तिकडे भारताचा गौरव, भारताचा आत्मा असलेल्या भगवतगीतेवर रशिया आणि सिरिया या राष्ट्रांत बंदी आणण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होते, तरीही आम्ही गप्प राहतो. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगाची ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. ज्याचा काल्पनिक छायाचित्रातील चेहरा पाहूनही आज समाज आपली दु:ख विसरतो, त्या कृष्णाला प्रश्न पडावा, अशी ही कृती आहे, इतकी ही असंवेदनशीलता आहे. खरं तर भारत सरकारने हस्तक्षेप करावा, असा हा विषय निश्चितपणे आहे. आपल्या संविधानातही श्रीमद् भगवतगीतेला मानाचे स्थान आहे. आजही भारतीय न्यायालयांमध्ये ज्यावर हात ठेऊन साक्षी दिल्या जातात, तो प्रमाणग्रंथ भगवतगीताच आहे. जीवन जगण्याची कला ज्यात सांगितली आहे, तो ग्रंथ हाच आहे. नशिब अजून आपल्या देशातील कथित धर्मनिरपेक्षवाद्यांना न्यायालयातून गीता घालवावी वाटलेली नाही.


अठरा अध्यायांच्या या भगवतगीतेत हिंसाचाराला खतपाणी घातले आहे, हा मुख्य आक्षेप आहे. युद्धासाठी प्रवृत्त करणारा हा ग्रंथ आहे, असाही आक्षेप रशिया आणि सिरियातील न्यायालयांमध्ये दाखल खटल्यांतून करण्यात आला आहे. वस्तुत: गीतेत ज्या युद्धाचे वर्णन आहे, ते युद्ध धर्माचे आहे आणि ते अधर्माच्या विरोधातील आहे. अशी युद्धं आजही जगाच्या पाठीवर लढली जातातच. इराकमध्ये गेली नऊ वर्ष अमेरिकेने जे युद्ध पुकारले होते, ते काल-परवाच संपले. अमेरिकेचे संपूर्ण सैन्य परत आले. हे युद्ध काय होते? पाकिस्तानात नाटोच्या सैन्याने दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी घेतलेला पुढाकार यापेक्षा वेगळे काय होते? अफगाणीस्तानातील संघर्ष, लादेन, ….ला ठार करण्यासाठी घेण्यात आलेला पुढाकार हे सारे अधर्माच्या विरोधातील संघर्षच तर होते. आम्ही त्या सार्‍यांचे स्वागतही केले. कारण, या युद्धातील आर्थिक महाशक्तींचे वैयक्तिक स्वार्थ काहीही असले तरी पृथ्वीतलावरील कलियुगीन राक्षसं त्यातून ठार मारली गेली. राक्षसांच्या नायनाटाचे स्वागतच करायचे असते आणि त्यासाठी प्रसंगी कोणताही मार्ग हा स्वीकारायचा असतो, हे तर आम्हाला याच भगवतगीतेने शिकविले. म्हणूनही ही भगवतगीता आम्हाला शीरोधार्य आहे.


आहे तरी काय भगवतगीतेत, ज्याने हिंसाचाराला, युद्धाला प्रोत्साहन मिळते? भगवंताने अर्जूनाला केलेला उपदेश, सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानकर्म संन्यासयोग, कर्मसंन्यास योग, आत्मसंयम योग, ज्ञानविज्ञान योग, अक्षरब्रम्ह योग, राजविद्याराजगुह्ययोग, विभूतीयोग, विश्वरूपदर्शन योग, भक्तीयोग, क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग, गुणत्रयविभागयोग, पुरूषोत्तमयोग, दैवासुरसंपद्विभागयोग, श्रद्धात्रयविभागयोग आणि प्रत्येक भारतीयाची जी इच्छा असते, तो अंतिम मोक्षसंन्यासयोग. या अठरा अध्यायातील 80 टक्के प्रकरणे ही केवळ ज्ञानाची आहेत. ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव:’ या वाक्याने सुरूवात झाली म्हणून त्यात केवळ कुरूक्षेत्राचेच वर्णन आहे, असा अर्थ अजीबात होत नाही. यात युद्धाभ्यास आहे, हे नाकारून चालणार नाही. पण, बंदी घालताना आम्ही केवळ युद्धाभ्यास आहे, एवढाच विचार करणार असू, तर ते आमच्या अज्ञानाचे लक्षण ठरेल. दारू पिणे घातक आहे, असे वाक्य जर एखाद्या पुस्तकात असेल तर त्यात दारू शब्द आला म्हणून आम्ही त्यावर बंदी टाकत नाही. त्यातील त्या शब्दांनी तयार झालेल्या वाक्यांचा आशय पाहतो. आशय जर सकारात्मक असेल आणि त्यातून चांगली शिकवण दिली जात असेल तर आम्ही त्या पुस्तकाला, ग्रंथाला पवित्र मानतो. ही आमची भारतीय शिकवण आहे.


रणांगणात उतरल्यानंतर अर्जुनाची झालेली अवस्था, कौरव पांडवांकडून झालेला शंखनाद, अर्जुनाच्या मनात निर्माण झालेली सहानुभूती, त्यावर कृष्णाने टाकलेला प्रकाश, क्षात्रधर्म, निष्काम कर्मयोग याचे वर्णन करीत पहिल्या दोन अध्यायात स्थिरबुद्धीच्या पुरूषाची लक्षणं कृष्णाने कथन केली आहेत. अगदी आजच्या काळात या श्लोकांचा अर्थ समजावून सांगता येईल. अमेरिकेने सद्दाम हुसेन, लादेनचा खात्मा केला. लादेन हा कुणाच्याच नात्यात नव्हता, त्यामुळे त्याचा वध करणे सोपे गेले. पण, समजा लादेन हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या नात्यात असता आणि तो दहशतवादी कारवायांमध्ये लिप्त असता, तरीसुद्धा त्याला ठार करण्यासाठीच पुढाकार घ्यायला हवा, हेच तेवढे भगवतगीतेत सांगितले आहे. अधर्माविरोधातील युद्ध हे भावनेच्या आहारी जाऊन लढता येत नाही. आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री कितीही मोठा असला तरी तो जर भ्रष्टाचारी असेल तर त्यालाही एखाद्या गुन्हेगाराप्रमाणेच शिक्षा व्हायला हवी, हीच कृष्णाने सांंगितलेली गीता आहे. रशिया आणि सिरिया या दोन्ही राष्ट्रांतील खटल्यांमध्ये गीतेचा आशय, अर्थ याकडे दुर्लक्ष करून त्यातील भाषेचा, वर्णनाचा साधा अर्थ घेत या पवित्र ग्रंथावर बंदी टाकली जाण्याचा निर्णय जगाच्या अस्तित्त्वाला घातक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.


अज्ञान कसा दूर सारायचा, ज्ञान कसे प्राप्त करायचे, राग-द्वेष बाजुला सारत कर्म करीत राहण्याला प्राधान्य कसे द्यायचे, वासनांवर नियंत्रण कसे मिळवायचे (ज्याची आज या पाश्चिमात्य राष्ट्रांना सर्वाधिक गरज आहे), सद्गुण परमेश्वराचे रूप, निष्काम कर्मयोग, योगी आणि महापुरूषांचे आचरण आणि त्यांच्या महीमा, ज्ञान म्हणजे नेमके काय, निष्काम कर्मयोग म्हणजे काय, भक्तीसह ज्ञानयोग, योगी पुरूषांची लक्षणं, आत्मउद्धारची प्रेरणा आणि भगवतप्राप्तीलायक पुरूषाचे वर्णन, मनाचा निग्रह कसा करायचा, कोणत्याही विषयाचे विज्ञानासह ज्ञान कसे प्राप्त करून घ्यायचे, सर्व पदार्थांमध्ये परमेश्वराची व्यापकता अशी विराजमान आहे, आसुरी प्रवृद्धीचा निषेध आणि भगवतभक्तांची प्रशंसा, देवतांची उपासना, ब्रम्ह, अध्यात्म आणि कर्माबद्दल अर्जुनाने विचारलेले प्रश्न आणि त्याची भगवंतांनी दिलेली उत्तरं यात कुठेतरी हिंसाचार आणि युद्ध आहे का?
सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते ।
अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम् ॥

ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व काळांमध्ये एक अविनाशी परमात्मभावाला विभागरहीत, समभावाने पाहतो त्या ज्ञानाला सात्विक समजले पाहिजे. एकतर जगाने हे लक्षात घेतले पाहिजे किंवा मग कृष्णाने पुन्हा ‘यदा यदा ही धर्मस्य’ कलियुगातील कल्की अवतार लवकर घेतला पाहिजे.