बाळासाहेब गेले, पुढे काय?

balasaheb
(नोव्हेंबर 2012 मध्ये लिहिलेला लेख)

मृत्यू हा अपरिहार्य आहे. ते जीवनातील अंतिम सत्य आहे. महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणात देवत्त्व प्राप्त झालेल्या फार थोडक्या नेत्यांपैकी बाळासाहेब ठाकरे एक. जेथे देशातील सर्वाधिक बुद्धीमान लोक राहण्याचा दावा केला जातो, अशा दक्षिणेत अनेक नेते, अभिनेत्यांची देवळं बांधली जातात. बाळासाहेबांची महाराष्ट्रात कुठेही देवळं बांधली गेली नाही. पण, भरकटलेला तरुण िंहदूत्त्वाच्या सूत्रात बांधण्याचे समाजकार्य खर्‍या अर्थाने बाळासाहेबांना साधता आले. म्हणूनच मंदिर नसलं तरी अनेकांच्या हृदयातील हा देव होता. शिवसेनाप्रमुख म्हणून पक्षाच्या स्थापनेपासून ते राज्यांतील सत्ताप्राप्तीपर्यंत आणि पुढे कुटुंबातील विभाजनापर्यंतचा प्रवास या नेत्याने आपल्या राजकारणातील पाच दशकात अनुभवला आहे. आपला हा संपूर्ण प्रवास त्यांनी 17 नोव्हेंबर 2012 रोजी थांबविला. शिवसेनेची कार्यपद्धती, त्यांची धोरणे याबद्दल या लोकशाहीत अनेक मतभेद असू शकतात. पण, आक्रमक िंहदूत्त्व मांडण्याचे काम त्यांनी केले आणि ते कुठेतरी आवश्यकही होते, हे कदापिही विसरता येणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात डोकावून पाहिले तर तेव्हाही स्वातंत्र्यप्राप्तीचे दोन मार्ग होते. एक जहालवाद्यांचा गट होता, तर दुसरा मवाळ. स्वातंत्र्य मिळाले ते केवळ गांधी, नेहरूंमुळे असा आजही अनेकांचा दावा आहे आणि तेथेच वीर सावरकर, लोकमान्य टिळक, भगतिंसग यांचा साधा नामोल्लेखही अनेकांना लज्जास्पद वाटतो. दावे-प्रतिदावे कितीही होत असले तरी जहाल आणि मवाळ या दोन्ही गटांचे एक वेगळे महत्त्व होते. दोघांचीही प्रसंगानुरूप आवश्यकता असते, हेही मान्यच करावे लागेल. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यपद्धतीवरील टीकाही त्याच क्रमवारीत येते.


आपल्यापुढचा प्रश्न आहे तो, पुढचा. आता शिवसेनेचं काय होणार? ती कोण चालविणार? कशी चालविणार? आज शिवसेनाप्रमुख हयात नसताना स्वाभाविकपणे उद्धव ठाकरेंकडे ते पद चालून येते. उद्धव हे आतापर्यंत कार्याध्यक्ष होते, ते आता शिवसेनाप्रमुख होऊ शकतात. िंहदूहृदयसम्राट या पदापर्यंत पोहोचण्यास त्यांना अवधी लागेल आणि त्यांनी तो समजूनही घेतला पाहिजे. शिवसेनेच्या नेतृत्त्वाचे दोन वाटेकरी होते. एक उद्धव ठाकरे आणि दुसरे राज ठाकरे. बाळासाहेबांचे राजकीय वारस्याचे गुण उद्धव ठाकरेंमध्ये नाहीत. ते उत्तम प्रबंधक असले तरी उत्तम नेते नाहीत, असा एक दावा केला जात होता. मध्यंतरीच्या काळात छगन भुजबळ, नारायण राणे हे शिवसेनेबाहेर पडले, तेव्हाही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. अशात राज ठाकरे हे हुबेहुब बाळासाहेब वाटतात, त्यांच्याचसारखे भाषण करतात, आक्रमकता ही त्यांना मिळालेली नैसर्गिक देण आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच राज हेच शिवसेनेचा चेहरा होऊ शकतात, असाही एक सिद्धांत मांडण्याचा जोरकस प्रयत्न झाला.


बाळासाहेबांचे अनेकांवर उपकार आहेत, त्यामुळे ते हयात असेपर्यंत तरी राज आणि उद्धव या विभाजनात बडे नेते राज ठाकरेंच्या जवळ जाणार नाहीत. पण, ते नसताना मात्र शिवसेनेत उभी फूट पडून राजसमर्थक वाढतील आणि हळूहळू शिवसेना कमजोर पडत जाईल, असाही दावा करणारा एक मोठा वर्ग राजकारणात होता. राजकारणाच्या गल्लीबोळात शिवसेना हा विषय अतिशय जिव्हाळ्याने हाताळला जातो. शिवसेनेची कार्यपद्धती राज यांना कळली आणि ते त्यानुरूप वागतात, हा एक दाखला त्यासाठी दिला जायचा. आज दुर्दैवाने महाराष्ट्रावर या चर्चेची सत्यता पडताळून पाहण्याची वेळ आली आहे. ही चर्चा खरी होती की तात्पुरती हेही येणारा काळच सांगणार आहे. एक मात्र नक्की की राज आणि उद्धव यांचे असे हे विभक्त वागणे, हे महाराष्ट्राच्या, मराठीच्या आणि िंहदूत्त्वाच्या हिताचे नाही.
बाळासाहेबांसारख्या ज्येष्ठ, कर्मनिष्ठ नेत्याचे नेतृत्त्व मान्य करणारी एक मोठी फळी शिवसेनेजवळ आहे. त्यात सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर, रामदास कदम अशी नावे घेतली जातात. एकेकाळी मनोहर जोशी, दत्ताजी नलावडे, सुरेश प्रभू ही सुद्धा नावे यायची. मनोहर जोशी राष्ट्रीय राजकारणात गेले आणि आता ते काहीसे दूर आहेत. दत्ताजी नलावडेंची प्रकृती ठीक नसते आणि सुरेश प्रभूंनी तर स्वत:ला सामाजिक कार्यात गुंतवून घेतले आहे. शिवसेनेतील नेत्यांची आजची नावे तपासली, तर उद्धव यांचे नेतृत्त्व अमान्य करणारी कोणतेही नेतेमंडळी नाहीत, हेच दिसते. राज ठाकरेंजवळ केवळ बाळ नांदगावकर यांच्यासारख्या अभ्यासू आणि संघटनकौशल्य असलेला नेता आहे. इतर सारे नेते नवीन आहेत. याचा अर्थ नवीन नेते तयार होणारच नाहीत, असाही नाही. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली, तेव्हाही अशीच स्थिती होती. पण, त्यातून नेतृत्त्वाची एक मोठी फौज आपोआप उभी झाली. तशी फौज उभी करण्यात उद्धव आणि राज हे दोघेही आपआपल्या पक्षात यशस्वी होऊ शकतात.


बाळासाहेबांची पोकळी भरून निघणे, हे इतक्यात जमणारे नाही. त्यासाठी काही कालखंड जाऊच द्यावा लागेल. त्यांच्या तोडीचा नेता केवळ शिवसेनेत नाही, तर महाराष्ट्रात उभा व्हायला काही काळ लागणार आहे. उद्धव आणि राज एकत्र येण्याची शक्यता आज विचारात घेतली तर ती शून्य आहे. कारण, आज भावनिकदृष्ट्या ते एक आले तरी उद्या या भावना संपल्यानंतर वर्चस्वाची लढाई पुन्हा सुरु होईल. ती लढाई तेव्हा सुरु होण्यापेक्षा त्यांनी आजच वेगळे राहिलेले बरे. उद्धवपेक्षा राज बरे, असे वाटू शकणार्‍यांची संख्या कदाचित मोठी असेल. पण, ते उद्धव यांना मान्य असेल काय? िंकवा राजपेक्षा उद्धव चांगले, असेही अनेकांना वाटत असेल. पण, ते राज यांना मान्य आहे काय? यापैकी कुणाला एखादी गोष्ट मान्य असती, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्मच झाला नसता. बाळासाहेबांच्या हयातीतच ही फूट आपण पाहिली. ती बाळासाहेबांना मान्य नव्हती. पण, त्यांनाही त्या घटनाक्रमाकडे हताशपणे पहावेच लागले होते ना!


आक्रमकता आणि संघटनकौशल्य एकत्रितपणे राहूच शकत नाही काय? एकाच संघटनेचे हे दोन चेहरे राहू शकत नाहीत काय? निश्चितपणे राहू शकतात. आपण िंहदूंच्या, मराठी माणसाच्या एकजुटीसाठी जन्मलो आहोत, ही बाब या दोन्ही नेत्यांनी लक्षात घेतली तर त्यांचे ऐक्य अशक्य नाही. उलट ती अधिक सोपी बाब आहे. आज ती काळाची गरजही आहे. शिवसेनाप्रमुखांच्या थकत्या काळात मुंबईत रजा अकादमीने घातलेला गोंधळ हा मुंबईवर झालेला छुपा हल्लाच होता. नव्हे, ती येणार्‍या काळाची नांदी होती. शिवसेना जितकी कमजोर पडत जाईल, तितका हिरवा उच्छाद वाढणार आहे. मतांच्या राजकारणात आकंठ बुडालेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचे अजीबात सोयरसुतक नाही. राज ठाकरेंनी रस्त्यावर उतरून जो माहौल केला, तेच त्याला देण्यात आलेले उत्तर होते. वस्तुत: हे उत्तर शिवसेनेने प्रथम द्यायला हवे होते, अशी अनेकांची धारणा होती. ते राज ठाकरेंकडून दिले गेले. हा संघर्ष येणार्‍या काळातही या दोन पक्षात पहायला मिळेल. पण, एकाच कुटुंबातील हे संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहण्यापेक्षा याच एका कुटुंबाने महाराष्ट्राच्या साथीने िंहदूत्त्वासाठी केलेला संघर्ष पहायला, अनुभवायला, सम्मिलित व्हायला सर्वांनाच आवडेल, यात शंका नाही.


पहिला पर्याय
राज आणि उद्धव या दोघांनीही हे ध्यानात घेतले पाहिजे की, आज जे साम्राज्य या दोघांच्या वाट्याला चालून आले, त्यामागचे संपूर्ण परिश्रम, पुण्याई बाळासाहेबांची आहे. त्यांची इच्छा या दोन्ही नेत्यांनी शिरोधार्य मानली पाहिजे. मनसेलाही जे घवघवीत यश मिळाले, त्यामागे बाळासाहेबांचीच पुण्याई आहे. राज ठाकरेंना राजकारणातील पहिले व्यासपीठ बाळासाहेबांनीच उपलब्ध करून दिले होते. उद्धव हे घरातील मोठे आहेत, म्हणून त्यांचे भाऊ म्हणून असलेले मोठेपण मान्य करीत त्यांना शिवसेनाप्रमुखपदी आसीन करायला हवे आणि कार्याध्यक्षपदाची सूत्रे राज ठाकरे यांच्याकडे यावीत. असे होणे हे महाराष्ट्राच्या हिताचे ठरेल. महाराष्ट्रातील हिंदू मतांचे विभाजन यामुळे टाळता येऊ शकेल. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे पतन घडवायचे असेल तर हे अतिशय आवश्यक आहे. ही सर्व प्रक्रिया पार पाडण्याची आज कोणतीही घाई नाही. मात्र, हा निर्णय कुठल्याही स्थितीत 2013 च्या अखेरीपर्यंत व्हायला हवा. मध्यावधी न झाल्यास 2014 हे वर्ष मे महिन्यात लोकसभा आणि सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक घेऊन येणारे आहे. त्यापूर्वी कुठल्याही स्थितीत हे मनोमीलन आवश्यक आहे. अर्थात राज आणि उद्धव यांचे जवळ येणे हा आजच्या राजकीय परिस्थितीत तरी केवळ मराठी आणि िंहदू मनातील आशावाद तेवढा वाटतो आहे.


दुसरा पर्याय
एक दुसरा पर्याय आणखी आहे. तो म्हणजे मनसे आणि शिवसेना यांनी निवडणुका स्वतंत्रपणेच लढाव्यात आणि नंतर युतीच्या रूपाने एकत्र यावे. मात्र एकत्रितपणे निवडणुका लढताना जेथे शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, तेथे मनसेने कमकुवत उमेदवार द्यावा आणि जेथे मनसेचे प्राबल्य आहे, तेथे शिवसेनेने कमजोर उमेदवार द्यावा. राजकारणात अशा तडजोडी जेथे भीन्न पक्षीय पातळीवर होतात, तेथे हे तर एकाच कुटुंबातील दोन पक्ष आहेत. या दोन पक्षांनी एकत्र येऊन भाजपासोबत युती करावी आणि महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवावा. गेल्या लोकसभा निवडणुकीत युतीचे आठ ते नऊ खासदार केवळ मनसेमुळे पराभूत झाले होते. विधानसभा निवडणुकीत सुद्धा मनसेने नऊ आमदार निवडून आणताना युतीची मोठी हानी केली होती. या दोनपैकी एकही शक्यता पडताळून न पाहिल्यास महाराष्ट्रात कारभारशून्य असूनही, देशभरात संतापाची लाट असूनही ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा विजय सुकर करण्यासारखे ठरेल.


तिसरा पर्याय
बाळासाहेबांच्या निधनानंतर छगन भुजबळ यांनी मुलाखतीत एक सूचक संकेत दिले होते. तेथेच या तिसर्‍या पर्यायाचे दर्शन होते. हे दोन पक्ष एकत्र आले नाही तरी चालेल. पण, त्यांनी स्वतंत्र पक्ष म्हणून थेट युती करावी. ही दुसर्‍या पर्यायासारखी छुपी नसेल तर उघडउघड असेल. यातून पारदर्शी राजकारण केल्यासारखेही होईल. शिवाय या दोन्ही पक्षांच्या भूमिका काही भीन्न नाही. मराठी आणि िंहदूत्त्व हे शिवसेनेचे आधारस्तंभ आहेत. मनसेला आज केवळ मराठीप्रेम वाटते. पण, तेही प्रखर िंहदुत्त्ववादी आहेत, यात कुणाच्याही मनात शंका नाही. एकच आचार, एकच विचार, एकच प्रचार फक्त पक्ष दोन, असा हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. फार फार तर प्रारंभी रामदास आठवले यांचा याला विरोध असेल. पण, तो फार काळ टिकणार नाही. या दोन्ही पक्षांना जागावाटप करताना पाच ते सहा ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील. त्या त्यांनी कराव्यात. या दोन्ही पक्षांची ताकद एक झाल्यास इतर अनेक ठिकाणी त्यांचे विजय सुकर होतील आणि त्यातून या जागांचे नुकसान सहजपणे भरून काढता येऊ शकते.

भाजपाचा पुढाकार
शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या भवितव्यावर कुठेतरी भाजपाचेही भविष्य अवलंबून आहे. एवढे एक नक्की की या दोघांना एकत्र आणण्याचा िंकवा दूर राहून समन्वयापर्यंत आणण्याचा नेमका प्रयत्न येणार्‍या वर्षांत होईल. त्याला हे दोन बंधू कसा प्रतिसाद देतात, हे बघण्यासारखे असेल. पण, या दोन पक्षांनी युती करावी आणि एकत्रितपणे भाजपाशी जागांबाबत वाटाघाटी कराव्यात. महाराष्ट्राच्या राजकारणाची दशा आणि दिशा या प्रयत्नांतून ठरणार आहे. भावनिक गुंतवण आज अधिक असताना प्रयत्नांचा श्रीगणेशा कदाचित भावनिक आधारावर ठरू शकतो. डिसेंबर महिना जाऊ द्यावा. मात्र नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यापासूनच या प्रयत्नांना वेग देण्याची गरज आहे. या युतीतील एक बंधू म्हणून भाजपाची जबाबदारी यात अधिक आहे. तसा पुढाकार घेण्याच्या दृष्टीनेही हालचाली प्रारंभ झाल्याही असतील. आता त्याला अधिक वेग देण्याची गरज आहे. काही राजकीय विश्र्लेषक तर या सर्व घडामोडी 2012 च्या अखेरीपर्यंत झालेल्या असतील, असे मानतात. राज आणि उद्धव यांनी एकच स्वप्न बाळगले आहे. त्यांचे ध्येय या महाराष्ट्रातील मराठी माणसाचे हित जपण्यात आहे, मुंबईवरील परकीयांचे आक्रमण थोपविण्याचे आहे, मग एकत्र येण्यातील कौटुंबिक अडचण दूर सारणे असे किती कठीण काम असावे? शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेली 21 लाख जनता तोंडातून बोलू शकत नसली तरी या दोघांनी त्यांच्या हितासाठी एकत्र यावे, हेच सांगत होती. बाळासाहेबांच्या जाण्यामुळे आलेल्या पोरकेपणावर हेच एक उत्तम औषध ठरू शकते, याचे भान या दोन्ही नेत्यांनी ठेवावे. त्यांच्या डोक्यात फक्त एकच विषय असावा आणि तो म्हणजे महाराष्ट्रात भगवा फडकाविणे, हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.