मंगळ प्रवास

Mangal
(8 ऑगस्ट 2012 रोजी लिहिलेला लेख)

ग्रहांचेही आपले एक सौंदर्य असते. कुणाला शुक्र भुरळ घालतो, तर कुणाला चंद्र. कुणाला कविता सुचतात, तर कुणाला पानभर लेख लिहावेसे वाटतात. लालचुटूक मंगळही याला अपवाद नाही. मंगळाचे रत्न मानले जाणारे पोवळे तर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्राला शोभा देते. आज जरी फॅशन नसली, तरी खेड्यांमध्ये आजही मंगळसूत्रात पोवळे असतेच. मंगळाचा ज्योतिषशास्त्रदृष्ट्या अभ्यास केला तर अडचणी आणणारा हा ग्रह. अहो एवढेच काय, लग्नासाठी जेव्हा तरुण-तरुणींचा शोध घेतला जातो, तेव्हा मंगळाची कुंडली केवढा गदारोळ माजविते. या शास्त्रावर विश्वास न ठेवणारेही चटकन पुढच्या गाठी बांधण्यापूर्वी सावध झालेले असतात.


एकूणच उपद्रवी आणि शनीनंतर कुणाला घाबरले जात असेल तर ते मंगळाला. असा हा मंगळ शास्त्रज्ञांच्याही ओढीचा विषय बनला आहे. नासाचे रोव्हर सोमवारी सकाळी ११.०७ मिनिटांनी यशस्वीपणे मंगळावर उतरले आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. शनीची साडेसात वर्षे धोक्याची असतात, असं म्हणतात. पण, मंगळाने केवळ सातच मिनिटं शास्त्रज्ञांच्या नाकात दम आणला होता. शास्त्रीय भाषेत त्याला ङङ्गसेव्हन मिनिट्‌स ऑफ टेरर’ असं म्हणतात. यापूर्वी सातवेळा असा प्रयत्न करण्यात आला. १९७१ मध्ये पहिल्या प्रयत्नांत तर हे यान मंगळावर उतरूच शकले नव्हते. त्या मानाने आजचे सात मिनिटं सुखावणारे ठरले. त्या यानाने जेव्हा पहिलं चित्र पाठविलं, तेव्हा शास्त्रज्ञ एकमेकांना आलिंगन देत होते, अन्‌ काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. हे यान सध्या केवळ काळे-पांढरे चित्र पाठवीत असून, रंगीत छायाचित्र पाठविण्यासाठी त्याला किमान आठवडाभराचा अवधी तरी लागेल.


मंगळाच्या ज्ञानप्राप्तीचा हा शास्त्रीय प्रवास १९७१ मध्ये प्रारंभ झाला. पण, पहिल्याच प्रयत्नात तो फसला. दुसर्‍या प्रयत्नात यान उतरले, पण संपर्क तुटला. पुढे २६ वर्ष काहीही झाले नाही. १९९७ मध्ये पुन्हा तिसरा प्रयत्न झाला. यान उतरले आणि संपर्क तुटला. २००४ मध्ये पुन्हा प्रयत्न झाला. पण, यानाचे चाक वाळूत फसले आणि २०१० मध्ये नासाला पराभव मान्य करावा लागला. या मोहिमेचे नाव प्रेरणा’ होते. नंतरच्या मोहिमेचे नाव संधी’ ठेवले गेले. आज जे यान उतरले, आता या मोहिमेचे नाव उत्कंठा’ आहे. मंगळ आपल्या स्वभावाप्रमाणे चकवाचकवीचा खेळ खेळतो आहे आणि शास्त्रज्ञ रोज नवीन आव्हाने याच मंगळाच्या बाबतीत स्वीकारत आहेत.


शास्त्रज्ञांना या शोधासाठी अनेक मुद्दे आहेत. पृथ्वी आणि मंगळ यांच्यात अनेक भिन्न बाबी आहेत. मंगळावर जे खडक आणि खनिजं आढळून येतात, ती पृथ्वीपेक्षा भिन्न आहेत. शास्त्रज्ञांच्या डोक्यात जो किडा आणखी वेगाने वळवळतो आहे, तो म्हणजे पर्वत कसे तयार होतात. पृथ्वीवरील पर्वतांमध्ये विविध स्तर असतात. तसे स्तर मंगळावर मात्र नाहीत. शास्त्रज्ञांना आणखी एक प्रश्न भेडसावतो आहे, तो म्हणजे मंगळावर जीवसृष्टी आहे काय? परग्रहावरील एलियन्स थिअरी’ आपल्याकडे फारशी प्रचलित नसली तरी विदेशात ती लोकप्रिय आहे आणि त्यांना त्याची ओढही आहे. मंगळ हा कोरडा आणि वातावरणाने अतिशय थंड असल्याने तेथे पाण्याची अजीबात शक्यता नाही.


नासाच्या शास्त्रज्ञांना ही मोहीम वेगाने हाती घेण्यासाठी आणखी काही कारणे आहेत. चीन अंतराळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करीत असल्याने ती अमेरिकेची गरजही होती. त्यामुळेच आजच्या या यशाने शास्त्रज्ञ अधिक आनंदित आहेत. तसे या मंगळाने शास्त्रज्ञांना जेरीसही आणले आहेच. त्याच्या ज्योतिषशास्त्रीय स्वभावाचे प्रतिबिंब शास्त्रज्ञांना मिळणार्‍या यशातही दिसून येत आहे. मंगळ जेवढे देतो, तेवढेच आपण घेतो, ही शास्त्रज्ञांची म्हणूनच बोलकी प्रतिक्रिया आहे. आज प्रेरणा आणि संधी आम्हाला मिळाली, हे जेव्हा शास्त्रज्ञ मान्य करतात, तेव्हा पुन्हा त्याचा ज्योतिषशास्त्रीय स्वभाव स्मरतो. आक्रमक मंगळ काही देत असेल, तर जगापेक्षा वेगळे काही तरी करून दाखविण्याची जिद्द, अतिरिक्त हिंमत, जोखीम, आव्हान स्वीकारण्याची क्षमता. मंगळाच्या वैज्ञानिक आणि अध्यात्मिक ज्ञानाचा हा प्रवास असाच पूरक ठरो आणि मानवाला त्याच्याबाबत अधिक माहिती कळो, ही प्रत्येकाचीच इच्छा असणार!