(7 फेब्रुवारी 2012 रोजी प्रकाशित लेख)
ज्यातून भावनांची अभिव्यक्ती योग्य प्रकारे होते आणि त्या भावना संभाषणातून एका हृदयातून दुसर्या हृदयात अचूकतेने पोहोचतात, त्यालाच भाषा संबोधणे योग्य ठरेल. भाषा कशाला म्हणतात, असा प्रश्न कुणी विचारला तर त्याची सोपी व्याख्या अशीच व्हायला हवी. अ.भा. मराठी साहित्य संमेलनात मराठीच्या दुरवस्थेला माध्यमेच जबाबदार आहेत काय, या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. वक्त्यांनी आपआपली भूमिका मांडली. येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, माध्यमांचा मुख्य धर्म हा बातमीदारी आहे. तो आपली बातमी ग्राहक म्हणा किंवा वाचकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असतो. कवि, लेखक, समीक्षक, आर्थिक तज्ञ, ललित लेखक असे साहित्यात निरनिराळे पिंड असले तरी माध्यमांमध्ये पत्रकार हा एकच आत्मा असतो. घटना घडल्यानंतर त्याला लगेच त्याला त्या भूमिकेत शिरावे लागते. प्रेमगीतांच्या कार्यक्रमाचे वृत्तसंकलन करताना त्याला कधी कुणाच्या मृत्यूची बातमी घेण्यासाठी घाटावर जावे लागेल, याचा काहीही नेम नसतो. अशा बातमीदारीला अनेक अलंकार असतात. कधी त्याची मांडणी, कधी सादरीकरण तर कधी भाषा. यातील भाषेवरच अधिक जोर द्यायचे ठरविले तर भाषा हे संवादाचे मुख्य माध्यम असल्याने माध्यमात संवाद भाषेचीच सामान्यपणे निवड केली जाते.
भाषेची शुद्धता बिघडविणे, असा माध्यमांचा कधीही हेतू नसतो. शिवाय, ज्याला आपण समग्र माध्यम म्हणतो, त्या माध्यमाची रचनाही विविधांगी असते. अनेक भाषा, अनेक प्रांतातील लोक तेथे काम करीत असतात. त्यांच्यावर बालपणापासून भाषेचे जे संस्कार झालेले असतात, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनीतून उमटत असते. शेवटी माध्यमांची भाषा ही माध्यमांची भाषा नसतेच. ती भाषा वापरणारेही जनसामान्यांपैकीच असतात. जनसामान्यांचेच तेथेही प्रतिनिधीत्त्व असते. माध्यमांमध्ये एक संघर्ष आताशा अधिक तीव्र झाला आहे. जे जनतेला रूजते, ते द्यायचे की, जनतेची अभिरूची घडविण्याचे काम आपण करायचे? या संघर्षाला व्यवसायाची किनार आहे. ज्यांना निव्वळ व्यवसाय करायचा आहे, ते भाषाच काय, विचार, आचार, संस्कृती, तत्त्व यापैकी कशाहीही बांधिल राहत नाही. पण, ज्यांना अस्तित्त्वाचा व्यवसाय जपून या आचार-विचारांचे, भाषेचे, संस्कारांचे मूल्य ठावूक आहे, ते आपल्यापरीने या सर्वांचे हित जपण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असतात. त्यामुळे माध्यमे म्हणजे कोण, हेही आधी ठरवावे लागेल.
हे अजीबात अमान्य करून चालणार नाही की, आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भाषा नावाचा प्रकारच उरलेला नाही. ई-मेल आणि एसएमएसने केवळ मराठी भाषेचा कचरा केला असे नाही, तर इंग्रजीचेही बारा वाजविले आहेत. पूर्वी इंग्रजीच्या वाक्यरचनेतील व्याकरणाच्या चुका, स्पेलिंगच्या चुका हा हास्याचा विषय ठरायचा. आज अचूक इंग्रजी हा हास्यास्पद विषय आहे. एखाद्याला ‘आय अॅम वेटिंग फॉर यू’ असा एसएमएस पाठविला जात असेल तर ‘अॅम’चे संपूर्ण स्पेलिंग न लिहिता नुसता ‘एम’ लिहिला जातो. ‘यू’ साठी ‘वायओयू’ न लिहिता नुसते ‘यू’ लिहिले जाते. हे वाक्य असे लिहिण्याने आपल्या मनातील भावना दुसर्यापर्यंत पोहोचण्याचे काम होते काय, तर उत्तर होकारार्थीच येईल. मग ही सुद्धा तरूणाईची भाषा ठरते. माध्यमांच्या बाबतीत विचार केला तर आज भडक बातम्यांचे युग आहे. बातमी समजून घ्यायला खरंच किती लोक तयार असतात? बातमी लहानशीच असते. पण, त्याचा आलेख असा काही मांडला जातो की जणू तीच गावांतील सर्वांत मोठी बातमी आहे, या थाटात ती सांगितली जाते. वृत्तवाहिन्यांवर हा प्रकार आपण दररोज पाहतो. थोडक्यात काय तर प्रत्येक गोष्टीलाच ‘सेलिब्रेशन’च्या भुताने पछाडले आहे. अशात भाषेच्या शुद्धतेसाठी केवळ माध्यमांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे, हे अज्ञानाचे लक्षण मानले जाईल. माध्यमांचा व्यवसाय झाला, तेव्हापासूनच त्याचे पतन प्रारंभ झाले.
भाषेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे लोक आजही हयात आहेत. त्यांच्यासाठी आजही भाषा निश्चितच वेदनादायी आहे. पण, जुन्या युगातून नवीन युगात वाटचाल करीत असताना परिवर्तन हे अर्धवट कधीच होत नसते, हेही लक्षात घेतले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान जितके झपाट्याने वाढते आहे, तितक्याच झपाट्याने भाषेने मात्र पुढाकार घेतलेला दिसून येत नाही. नवीन तंत्रज्ञानात इंग्रजीचा शब्दकोष झटकन तयार झाला. पण, मराठी भाषेचा शब्दकोष अजूनही तयार झालेला नाही. गूगलवर भाषांतराच्या सदरात इंग्रजी शब्दाचा हिंदी अनुवाद झटकन मिळतो. पण, मराठीत मात्र तो मिळत नाही. भ्रमणध्वनीवर इंग्रजी बटना आल्या. पण, संपूर्णत: मराठी टंकलिखित करता येईल, अशा बटनांचा मोबाईल तयार झाला नाही. एकूणच भाषेने तंत्रज्ञान न स्वीकारल्याचा हा परिणाम आहे. आज इंग्रजीतील कोणतेही साहित्य झटक्यात इंटरनेटच्या मायाजालात उपलब्ध होते. पण, मराठीतील साहित्य इंटरनेटवरून नव्या पिढीला पाहायला मिळत नाही. मराठी व्याकरणाचे, र्हस्व-दीर्घ नियम सांगणारे सॉफ्टवेअर आमच्या मराठी तरूणांना का तयार करावे वाटले नाही? त्यामानाने संस्कृतने केलेली प्रगती उल्लेखनीय म्हणावी लागेल. संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी आयुष्य वाहून देणारे लोक आज आहेत. ते मूठभर लोक जर एवढे मोठे काम करू शकतात, तर पायलीच्या पन्नास संख्येत असलेले साहित्यिक मराठी संवर्धनाचे काम थोडा पैसा खर्च करून, तंत्रज्ञ मंडळींना हाताशी धरून का करू शकत नाही, हा फार मोठा आणि अनुत्तरित असा प्रश्न आहे.
आमच्यापैकी अनेकांचे ट्विटर किंवा फेसबुकवर खाते आहे. मराठी लिपी जगात कुठेही वाचता यावी, यासाठी युनिकोडचा पर्याय उपलब्ध झाला आहे. पण, किती लोक मराठीत संदेशवहन करतात. मराठीच्या मागासलेपणाचे उत्तर यात दडले आहे मित्रांनो. आम्ही मराठीच्या रक्षणाचे पाठिराखे तर आहोत. पण, नवीन तंत्र स्वीकारण्यासाठी आमची मात्र शिक्षणाची तयारी नाही. शिवाय, भाषा संवर्धनाची जबाबदारी कुणाची, हेही आम्ही अजून ठरविलेले नाही. भाषेचा आणखी एक नियम आहे. आपली भाषा दुसर्याला सांगायची असेल तर आधी त्याची भाषा शिकली पाहिजे. शेवटी कोणतीही भाषा वाईट नसते. संवादाचे हेच तर मुख्य कौशल्य आहे. साहित्य संमेलनात या विषयावर परिसंवाद घेण्यात आला, हे अतिशय चांगले झाले. निदान यातून एका चर्चेचा तरी जन्म झाला. मराठी भाषेच्या रक्षणाची जबाबदारी एकट्या साहित्यिकांचीही नाही. पण, ते या क्षेत्रात संघटितपणे काम करताहेत. लोकांना मराठी हवी आहे. पण, आजचा काळ, आजचे तंत्र त्यांच्यापासून त्यांची भाषा हिरावून नेत आहे. त्यांना तेच तंत्र जर मराठीत उपलब्ध करून दिले, तर ते मराठीपासून दूर जाणार नाहीत, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.
माध्यमातील भाषा संवर्धनाच्याही याच अडचणी आहेत. त्यामुळेच आज अनेक शब्द काळाच्या ओघात विरत चालले आहेत. निवडणुकीचा काळ आहे. नेत्यांमध्ये वाद उफाळून येतात, कार्यकर्त्यांमध्ये भांडणे होतात. त्या बातम्यांच्या मथळ्यात ‘फ्री स्टाईल’ हेच शब्द येतात. कारण, ते लोकांच्या मनाला जाऊन भिडतात. तुंबळ हाणामारीतून कदाचित मारामारीची तीव्रता वाचकांपर्यंत पोहोचत नसावी. नागपुरात नुकतीच एक मोठी इमारत कोसळली. काही त्याला इमारतचे खचणेही म्हणतील. पण, ग्रामीण भागात इमारत कोसळत नाही तर धसते. ही बोली भाषा आहे. प्रमाणभाषा असो की बोलीभाषा, मुळात भाषेची योजना ही संवादासाठी आहे. त्यामुळे त्या बातमीतून आपण ज्या वर्गाशी संवाद साधतोय्, ती भाषा तिथे अभिप्रेत असली पाहिजे. आर्थिक क्षेत्रातील तज्ञांना ‘इन्फ्लेशन’ ठावूक असते. सर्वसामान्यांना केवळ ‘महागाई’ माहिती असते. आता येथे ‘चलन फुगवटा’ हा शब्द केवळ वाणिज्य अभ्यासक्रम मराठीतून शिकणार्यांनाच ठावूक असतो. त्यामुळे संबंधित बातमीचा लक्ष्यीत वाचक हाच त्या बातमीची संवाद भाषा ठरवित असतो. माध्यमांचे हे असेच आहे आणि सध्याच्या काळात तरी याला पर्याय दिसून येत नाही. मग कुणी त्याला भाषेची थट्टा म्हणतील नाही तर कुणी ‘चक्कलस’!