मान्सूनचे आगमन 28 मे की 6 जूनला?

(जून 2014 मध्ये प्रकाशित)

सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मान्सूनच्या लहरीपणाबाबत जितकी चर्चा होते, तितकी दुर्दैवाने हवामान खात्याच्या लहरीपणाबाबत होताना दिसून येत नाही. म्हणूनच यंदाचा मान्सून 28 मे रोजी आला की 6 जून रोजी असा प्रश्न पडला आहे.साधारणपणे केरळातील 14 विभागांपैकी 60 टक्के परिसरात सलग दोन दिवस 2.5 मि.मी. पाऊस झाला की त्याच्या दुसर्‍या दिवशी मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करावे, अशी हवामान खात्याची नियमावली सांगते. अर्थात वार्‍याची दिशा आणि लॉंगवेव्ह रेडिएशन याचाही या निकषांमध्ये अंतर्भाव केला जातो. यंदा हे सारे निकष 28 मे रोजी पूर्ण झाले, असा दावा हवामानाचा अभ्यास करणार्‍या ‘स्कायमेट’ या संकेतस्थळाने केला आहे. मात्र तरीही भारतीय हवामान खात्याने मान्सून 6 जून रोजी जाहीर केला. असे का व्हावे, हा फार मोठा प्रश्न आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून जाहीर करताना वरिष्ठ पातळीवर काम करणार्‍या शास्त्रज्ञांचे असलेले वैयक्तिक हेवेदावे, केंद्र सरकारकडून मदत देण्यासाठी हीच माहिती वापरली जात असल्याने त्यानुरूप स्थानिक केंद्रांना येणारे निर्देश आणि त्यातून येणारे अहवाल हे या स्थितीसाठी कारणीभूत ठरत असतात. अनेकदा अनेक शास्त्रज्ञांनी आधीच काही तारखा जाहीर केल्या असल्याने त्या खर्‍या ठरण्यासाठी सुद्धा वाट पाहिली जाते, अशीही माहिती आहे.वर्तमानपत्रांजवळ हवामानाचा अभ्यास करण्याची कोणत्याही प्रकारची तज्ञता नसते. त्यामुळे साधारणपणे हवामान खात्याच्या स्थानिक कार्यालयाला दूरध्वनी करून याबाबतची माहिती घेतली जाते. तेथील स्थानिक अधिकारी दिल्लीतून दररोज जारी होणारे प्रसिद्धीपत्रक तेवढे वाचून दाखवितात. स्थानिक पातळीवर कोणतीही माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नसते. येथे लावण्यात आलेल्या उपकरणातून गोळा होणार्‍या माहितीचे पृथ:करण करणारे तज्ञही स्थानिक पातळीवर नसतात. त्यामुळे साधारणत: पुणे आणि दिल्ली कार्यालयातून दिलेल्या माहितीवरच अवलंबून रहावे लागते.

तरुण भारतने याबाबत काही तज्ञांशी बातचित केली, तेव्हा प्रकर्षाने ही उणीव जाणवली. स्कायमेट‘स्कायमेट’ या संकेतस्थळाने 28 मे रोजीच केरळात मान्सून दाखल झाल्याचा दावा केला. स्कायमेट ही संस्था 2003 पासून या क्षेत्रात काम करते. िंहदुस्थान टाईम्स या दैनिकासाठी काम प्रारंभ करणार्‍या स्कायमेटचे जाळे आता व्यापक प्रमाणात वाढले आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यात मान्सूनचे केव्हाच वर्दी दिल्याची बातमी ते रोज देत होते. पण, भारतीय हवामान खात्याने ही घोषणा 6 जूनला केली.वेदर अंडरग्राऊंडवेदर अंडरग्राऊंड ही आणखी एक संस्था आहे. या संस्थेचे अमेरिकेत 42 हजार हवामान केंद्र आहेत आणि याशिवाय जगात अन्यत्र 29 हजार हवामान केंद्र आहेत. ही संस्था हवामानाचे अंदाज नित्यनेमाने देते. आगामी दहा दिवसांचे तपशीलवार आणि पुढील महिनाभराचे ढोबळमानाने अंदाज ते देत असतात. त्यांनी सुद्धा 2 जूनपासून केरळात पाऊस दाखविला आहे.राजेश कपाडियागेल्या 45 वर्षांपासून हवामानासंबंधीचे अंदाज वर्तविणारे मुंबईमधील एक तज्ञ राजेश कपाडिया ‘वेगारियस डॉट इन’ या नावाने संकेतस्थळ चालवितात. जगभरातील हवामानाचा आढावा ते दररोज देत असतात. त्यांना तभाने संपर्क केला असता त्यांनी 2 जून रोजी केरळात मान्सून आल्याचे सांगितले. भारतीय हवामान खात्याच्या संदर्भात ते म्हणाले की, त्यांनी मान्सून जाहीर करण्यासाठी जे निकष ठरविले आहेत, ते प्राचीन, पण विश्वसनीय आहेत. यासंदर्भात अनेक जुनी पुस्तके, साहित्य आपणही वाचले. अर्थात कालानुरूप त्यात बदल आवश्यक आहेत. केरळात मान्सून जाहीर करताना हवामान खात्याने बरीच सावधानता बाळगलेली दिसते. 15 हजार फुटांवर वार्‍यांचा जो वेग असायला हवा, तो नसल्याने कदाचित त्यांनी घोषणा करण्यास विलंब लावला असेल. पण, त्यांनी जी प्रतिक्षा केली ती मान्सून स्थिरावण्याची होती. आगमन माझ्या मते 2 रोजी झालेले होते.

अशोक पटेल गुजरातच्या राजकोट येथे स्वत:चे वेदर स्टेशन चालविणारे अशोक पटेल यांनी मात्र हवामान खात्याच्या निष्कर्षांवरच ठाम राहणे पसंत केले. पण, हवामान खात्याचे मान्सून जाहीर करण्याचे निकष दर 30 वर्षांनी बदलणे आवश्यक आहेत, हे मात्र सांगितले. इतक्या जुन्या पद्धती आता कालबाह्य झाल्या आहेत. खरे तर हवामानाचा पॅटर्न हा फार फार तर 30 वर्ष असू शकतो. त्यापेक्षा जुना तो असता कामा नये, अशी मागणी त्यांनी केली. अर्थात खाजगीत अभ्यास करणारे, हवामानासंदर्भात काम करणारे कॉर्पोरेट्‌स िंकवा आमच्यासारखे खाजगी हवामान केंद्र चालविणार्‍यांपेक्षा हवामान खात्यालाच अधिक मान्यता मिळते, आमचा आवाज कोण ऐकणार, हेही त्यांनी बोलून दाखविले…..नागपूरचा पारा 49 पर्यंत!आजकाल प्रत्येकाकडे असणार्‍या स्मार्टफोनमुळे जणू काही हवामान खातेच त्यांच्या मोबाईलमध्ये सामावले आहे. अॅक्युवेदर, फोरेका, स्कायमेट अशा अनेक प्रकारचे अॅप त्यात काम करीत असतात. गेल्या दोन ते तीन दिवसांत नागपूरचा पारा त्या अॅप्समध्ये 49 अंशांपर्यंत गेल्याचे दाखविले गेले. त्यातून आणखी एक वेगळी चर्चा प्रारंभ झाली. नागपूरचे खरेच तापमान किती? सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे नोवा (एनओएए) आणि डब्ल्यू अंडरग्राऊंड या अमेरिकन हवामान खात्याशी संबंधित संस्था सुद्धा नागपूरचे तापमान शुक्रवारी 49 अंश इतके दाखवित होते. आपले हवामान खाते मात्र 46.7 वर ठाम होते. अमेरिकन संस्था दर तासाचे तापमान देतात, हे विशेष! यासंदर्भात अशोक पटेल यांनी सांगितले की, हे अॅप्स तापमान आणि रिअर फील अशा दोन्ही बाबी दाखवित असतात. थोडक्यात नागपूरचे तापमान समजा 47 अंश असेल आणि आर्द्रतेसारख्या अन्य घटकांमुळे ते जनतेला 49 अंशांपर्यंत जाणवत असेल तर अॅप्समध्ये ते 49 अंश इतके दाखविले जाते. याचा अर्थ तापमान जरी 47 असेल तरी लोकांना ते 49 अंश इतके जाणवत होते. अर्थात अशापद्धतीनेच प्रत्यक्ष लोकांना ते तापमान किती जाणवले, हे भारतीय हवामान खात्यानेही सांगायला हवे. जनतेने घाबरून जाऊ नये, ही तर तापमान दडविण्यामागे हवामान खात्याची भीती नसावी?

पेपर काढणारे आणि तपासणारे एकच : अक्षय देवरस

मान्सून आणि पाहुणे यात अंतर असल्याने खरे तर मान्सूनच्या आगमनाची नेमकी वेळ देताच येणार नाही. ज्या तारखांप्रमाणे सध्या हे ठरवले जाते की, मान्सून सामान्यापेक्षा लवकर आला की उशिरा त्या तारखा भारताच्या स्वातंत्र्यपूर्वीच्या आहेत. 1901 ते 1940 च्या दरम्यान जो पाऊस पडला, त्या आधारावर या मान्सूनच्या आगमनाच्या तारखा आहेत, असे हवामान शास्त्राचे युवा अभ्यासक अक्षय देवरस यांनी म्हटले आहे.1947 नंतर इंग्रज देश सोडून गेले, किती तरी सरकार बदलले, कायदे बदलले, लोकांची राहणी बदलली पण त्या तारखा जुन्याच! नैसर्गिक गोष्टींमध्ये कालांतराने बदल होत असतो. पण या गोष्टीत मात्र काहीच बदल झाला नाही हे लाजिरवाणे आहे. मान्सूनच्या वार्‍यांमुळे दक्षिण भारतात (केरळ, तमिळनाडू) 1 जूनच्या आसपास पाऊस पडला तरीसुद्धा मान्सून आला हे सांगण्यात उशीर. हवामान खात्याने 15 मे ला सांगितले होते की मान्सून केरळात 6 जूनला येणार. मग जरी मान्सूनची स्थिती 1 जूनपासूनच होती तरी 1 जूनलाच का सांगण्यात आले नाही? 5 जूनला मान्सून जाहीर करण्यात आला नाही, कारण त्यावर शंभर टक्के अंदाज कसा खरा ठरला, अशी चर्चा झाली असती. (कारण  15 दिवसाच्या पलीकडचे हवामान 100 टक्के बरोबर सांगणे हे अशक्यच) म्हणून 6 जूनला मान्सून आला! भारतात हवामान खात्याकडे सर्व अधिकार आहे. म्हणजेच परीक्षेचे प्रश्न पण ते काढतात (मान्सून केव्हा येणार?) आणि पेपरपण तेच तपासतात (मान्सून केव्हा आला?). जर हवामान खात्याकडून असे ऐकण्यात आले की आमचा मान्सूनचा अंदाज एकदम बरोबर होता तर समजायचे यात काही तरी गोम, असेही देवरस म्हणाले.