(2 ऑगस्ट 2012 रोजी लिहिलेला लेख)
अण्णा रविवारी उपोषणाला बसले आणि पाहता-पाहता जंतरमंतरवरील गर्दी वाढू लागली. काही प्रांत ज्याचे त्यानेच सांभाळायचे असतात. प्रयोगशीलता वाईट नाही. पण, प्रयोगाची कालमर्यादा मात्र निश्चित असली पाहिजे. किरण बेदी, अरविंद केजरीवाल यांनी अण्णांना काही काळ विश्रांती घेण्यास सांगून केलेला प्रयोग लगेच सावरला गेला, ही आनंदाची बाब आहे. प्रश्न- अण्णा, केजरीवाल, बेदी यांच्यापैकी सर्वाधिक लोकप्रिय कोण, याचा नाही. अण्णांच्या आंदोलनाने भ्रष्टाचार थांबेल काय, याचाही नाही. प्रश्न आहे तो समाजापुढे असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर उभ्या झालेल्या आंदोलनाचा. व्यक्तीपेक्षा त्या आंदोलनाची उपयोगिता अधिक मोठी आहे. असो. आज कदाचित या आंदोलनापेक्षाही ऑलिम्पिक हा जिव्हाळ्याचा प्रश्न असावा.
भारतात राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या, तेव्हा त्यात झालेला भ्रष्टाचार हा ऐरणीवर आलेला प्रश्न होता. सुरेश कलमाडींना या ऑलिम्पिकमध्ये जाता येणार नाही, असा निर्णय होण्यालाही तोच घोटाळा कारणीभूत होता. पण, घोटाळे केवळ भारतातच होतात असे नाही. भ्रष्टाचार ही भारताला नव्हे, तर अख्ख्या जगाला लागलेली मोठी कीड आहे. आज जागतिक पातळीवर दहशतवादाइतकीच गंभीर आणि मोठी समस्या भ्रष्टाचाराची आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. लंडन ऑलिम्पिकही त्याला अपवाद नाही. त्यामुळे तेथेही अण्णांची गरज आहेच. शनिवारी जेव्हा ऑलिम्पिकचे उद्घाटन झाले, तेव्हा जगाच्या नजरा खेळाकडे होत्या. पण, काही नजरा प्रेक्षक गॅलरीतील रिकाम्या जागा शोधत होत्या. कदाचित पहिला दिवस म्हणून त्याकडे दुर्लक्ष झाले. पण, रविवारही तसाच गेला. रिकाम्या खुर्च्या आणि अत्यल्प उपस्थिती सर्वांनाच अस्वस्थ करणारी होती. भारतात एक अण्णा हजारे काय करू शकतात, हे जगाने पाहिले. लंडनमध्येही रिकाम्या खुर्च्या पाहून ईड शोर्दोज अस्वस्थ झाले. दोन मुलांचे पिता असलेले शोर्दोज हे गेल्या दोन महिन्यांपासून या खेळांच्या तिकिटा मिळाव्या म्हणून इकडेतिकडे फिरत आहेत. भारताची ज्वाला गट्टा हिने तर कुटुंबीयांसाठी तिकिटे मिळावीत म्हणून रीतसर आयोजकांकडे मागणी केली. रक्कमही भरण्यास ती तयार होती. पण, त्यांना तिकिटा मिळाल्याच नाहीत. एकिकडे खेळाच्या खर्या रसिकांना तिकिटा मिळत नाहीत आणि दुसरीकडे मैदानावरील जागा रिकाम्या राहतात, याचा अर्थ काय? होय, लंडन ऑलिम्पिकमध्ये तिकीट घोटाळा झाल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे.
घोटाळा तर पुढे आला. आता त्यावर पुढचे काही महिने चर्वितचर्वण करण्यात अर्थ नाही. ब्रिटनच्या क्रीडामंत्र्यांनी तत्काळ याची चौकशी प्रारंभ केली आहे. तिकडे आयोजकांनी आंतरराष्ट्रीय आयोजन समितीशी संपर्क करून त्यांनाही या चौकशीत सामावून घेतले आहे. ऑलिम्पिकच्या सार्याच स्पर्धांना गर्दी होते, असे नाही. पण, बास्केटबॉल, विम्बल्डनसारखे खेळ पाहणार्यांची कमतरता भासावी, यावर कुणाचाही विश्वास नाही. त्यामुळेच स्थिती आणखी गंभीर आहे. आता जेथे रिकाम्या खुर्च्या आहेत, ते आसन क्रमांक कुणाला दिले गेले, याची चौकशी केली जाणार आहे. ब्रिटिश ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षांनी तर ३० मिनिटांचा नवा नियमच करण्याची घोषणा केली आहे. ज्याच्या नावे तिकीट आहे, अशी व्यक्ती न आल्यास किंवा उशिरा आल्यास ती तिकीट पुन्हा विक्रीला काढायची आणि खर्या क्रीडाप्रेमींना या स्पर्धांचा आनंद घेऊ ायचा, हा तो प्रस्ताव आहे. शनिवारी भारोत्तोलन स्पर्धेच्या वेळी तर उद्घोषकाला मैदानात कमी प्रेक्षक आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रेक्षकाने दोन वेळा टाळ्या वाजवाव्या, असे आवाहन करावे लागले होते. गर्दी इतकी कमी आहे की, सुरक्षेसाठी तैनात कर्मचारीसुद्धा रिकाम्या खुर्च्यांवर बसून आहेत. एकूणच हा तिकीट घोटाळा सध्या आयोजन समिती आणि ब्रिटिश सरकारसाठी डोकेदुखी ठरतो आहे. त्यामुळे सध्या तेथील क्रीडामंत्री रॉबर्टसन आणि सांस्कृतिक मंत्री जेरेमी हंट हे सार्या वादाच्या भोवर्यात उभे आहेत. लंडनमध्ये कुणी अण्णा तयार होण्यापूर्वीच या तिकीट घोटाळ्यावर पडदा पडावा, यातच त्यांची ऊर्जा खर्ची पडत आहे. ब्रिटनचे राजघराणे आणि बीबीसीसह सार्याच माध्यमांमध्ये हा तिकीट घोटाळा सध्या मोठा वादाचा विषय ठरत आहे.