हसतमुख अखेर!

vilasrao
(ऑगस्ट 2012 मध्ये लिहिलेला लेख)

वयाची ६७ वर्षे पार केली तरी विलासरावांच्या एकूणच शरीरयष्टीकडे आणि त्यांच्या कार्यक्षमतेकडे पाहल्यानंतर त्यांचे वय तितके असेल, यावर कुणाचा सहसा विश्वास बसणे शक्य नव्हते. वय एकवेळ लपविता येईल, पण आजार लपविता येत नसतो. आज विलासराव आपल्यात नाहीत, यावर म्हणूनच विश्वास बसत नाही. महाराष्ट्राने एक हसतमुख व्यक्तिमत्त्व आपल्यातून हिरावून नेले आहे. काँग्रेस पक्षात फार कुणाला नेते म्हणून मिरविता येत नाही, हे वास्तव असले तरी विलासराव त्याला अपवाद होते. आपल्यासाठी काही करेल, असे वाटणारे नेते फार कमी असतात. प्रत्येक जण आपला स्वार्थ साधत असतो. पण, कार्यकर्त्यांसाठी प्रसंगी वाईटपण घेणारे नेते फार कमी असतात. असे अनेक कार्यकर्ते विलासरावांनी जपले होते. त्यामुळेच ते आजारी असताना ठिकठिकाणी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना होत होत्या. प्रदीर्घ काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे होते, याचे रहस्यही यातच दडले होते. सर्वसमावेशक, कार्यकर्त्यांना सामावून घेणारे आणि राज्य करण्याची आपली स्वतंत्र शैली जोपासणारे असे ते नेते होते.


वादळं अनेकांच्या आयुष्यात येतात, तशी ती विलासरावांच्याही आयुष्यात आली. ते राजकारणात असल्यानं त्या वादळांची सार्वजनिकपणे चर्चा झाली आणि अवघ्या महाराष्ट्राने त्यावर आपली मतंही व्यक्त केली. पहिल्यांदा २००३ मध्ये त्यांना गटबाजीमुळे मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं आणि दुसर्‍यांदा २००८ च्या मुंबई बॉम्बस्फोटांनी त्यांच्यावर गंडांतर आणलं. हॉटेल ताजमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ते पाहणी करण्यासाठी गेले, तेव्हा राम गोपाल वर्मा त्यांच्यासोबत होते. माध्यमांमध्ये तुफान चर्चा झाली आणि श्रेष्ठींनी त्यांना दिल्लीत बोलावलं. केंद्रीय मंत्रिमंडळात अवजड उोग, ग्रामीण विकास आणि सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री अशी अनेक खाती त्यांनी सांभाळली. चर्चा अनेक होत्या. पण, विकार आतून त्रास देत असताना आरामासाठी त्यांनी निवडलेला तो मार्ग होता काय, असं आता वाटतंय्‌. यकृत आणि किडनी निकामी झाल्याचं आता अचानक पुढे आलं असलं तरी श्रेष्ठींना त्याची कल्पना नसावी, असं वाटत नाही.


विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्या, तेव्हाही विलासराव मुख्यमंत्री होते. राज्यावर ओढवलेले संकट त्यांनी बर्‍यापैकी हाताळले होते. पण, शेतकरी व्यसनाच्या आहारी जातात, तंबाखू चोळत बसतात, अशी अनेक विधाने त्यांना बदनाम करणारी ठरली होती. राजकारणात आश्वासनं पाळण्यासाठी नसतात, हेही त्यांचे विधान टीकेचे धन ठरले होते. काही वादळांचे अपवाद वगळले, तर माणूस म्हणून अतिशय चांगले व्यक्तिमत्त्व गमावण्याचे दुःख जसे महाराष्ट्राला आहे, तसे ते काँग्रेसला असेलच. महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचे वारे मध्यंतरी वाहत होते, तेव्हाही त्यांना पर्याय म्हणून आजही सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख हीच नावे पुढे यायची. अर्थात आदर्श घोटाळा हा या प्रक्रियेतील सर्वांत मोठा अडसर होता.


विलासराव हे स्वतः विनोदबुद्धीचे. विधानसभेत बोलायला उठले की ते कधी गंभीर व्हायचे आणि कधी चटकन एखादा विनोद करून जातील, सांगता यायचे नाही. त्यांची अनेक वादग्रस्त विधानं ही त्यांच्या विनोदबुद्धीतूनच जन्मली होती. अनेक नेते मोठे होतात. पण, त्यापैकी प्रत्येकालाच वलय जपता येत नसते. विलासरावांना हे वलय लाभले होते. ते मुख्यमंत्री असताना पक्षाची आणि राज्याची जणू संपूर्ण सूत्रे त्यांच्याच हाती जाणवायची. विलासरावांचा आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे स्मरणशक्ती. एकदा एखादी गोष्ट करायची ठरविली, तर ती ते केल्याशिवाय राहत नसत. मला अजूनही आठवते. हायकोर्ट बीट सांभाळत असताना राज्यातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्‍यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. जवळपास तीनशे उमेदवार पात्र ठरूनही वर्षभरापासून त्यांच्या नियुक्त्या होत नव्हत्या. हे वृत्त तरुण भारतने प्रकाशित केले, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री विलासरावच होते. विधी व न्याय खातेही त्यांच्याकडेच होते. यासंबंधी त्यांना विचारणा केली, तेव्हा ङङ्गमला माहिती नाही, फाईल पाहून सांगतो’ असे प्रामाणिक उत्तर त्यांनी दिले होते. जवळपास दोन महिन्यांनी पुन्हा त्या बातमीचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पुन्हा विलासरावांशी संपर्क झाला. तेव्हा लवकरच या नियुक्त्या होतील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आणि पुढच्या महिनाभरात या तीनशे नियुक्त्या झाल्याही. राज्यातील तीनशे उमेदवारांना न्याय मिळवून देण्याचे काम तभाला साधता आले. पण, त्याचवेळी विलासरावांच्या स्वभावातील चटकन कोणती गोष्ट लक्षात ठेवण्याची तळमळही जाणवली. त्यांना केलेला दूरध्वनी किंवा एसएमएस कधीही अनुत्तरित राहत नसे. मग ते राज्याचे प्रमुख असोत की केंद्रात मंत्री!


कोणत्याही परिस्थितीला धैर्याने तोंड दिले पाहिजे, हे त्यांच्या वागण्यातून कायम जाणवत असे. त्याचमुळे की काय, आदर्शसारखे गंभीर संकट उभे राहूनही विलासराव जराही डळमळले नाही. दिलीपकुमार सानंदांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातून झालेला दहा लाख रुपयांचा दंड, सुभाष घई यांना दिलेल्या जागेचे प्रकारण, नारायण राणे त्यांनी त्यांच्यापुढे निर्माण केलेले नेतृत्त्वाचे आव्हान असे कितीतरी प्रसंग सांगता येतील. पण, त्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य त्यांनी कधीही लयाला जाऊ दिले नाही. पत्रकारांमध्येही त्यांचा दांडगा संपर्क होता. त्यापैकी अनेक जवळचे मित्रही बनले होते. एक भारदस्त, अडत्या काळात काँग्रेसला तारून नेणारे आणि राजकीय आयुष्यात अनेक संकटांना तोंड देत धैर्याने राज्यकारभार चालविणार्‍या विलासरावांचा मृत्यू म्हणूनच चटका लावून जाणारा आहे.