निकालाच्या अर्थाची सप्तपदी…

narendra-modiji
(मे 2014 मध्ये प्रकाशित)

लोकसभा निवडणुकांचे निकाल शुक‘वारी सकाळपासून येऊ लागले तशी अनेकांच्या पायाखालची वाळू सरकत होती. कॉंग्रेस पक्ष भारतीय राजकारणातील इतक्या वाईट कामगिरीचे प्रदर्शन करेल, अशी अपेक्षाच कुणी केली नव्हती. अन्‌ सायंकाळपर्यंत ही दुर्दैवी पाळी कॉंग्रेसवर आली. या निवडणुकीत कॉंग्रेस पराभूत होणार, हे प्रत्येकालाच ठावूक होते. कॉंग्रेस दुहेरी आकड्यांवरच थांबेल, हेही भाजपा नेते सांगतच होते. पण, हा दुहेरी आकडा 44 असेल असे एकाही राजकीय पंडिताला वाटले नव्हते, हेही तितकेच खरे आहे. खरे तर या निकालांचा सर्वांत मोठा अर्थ येथेच दडला आहे.


कॉंग्रेसची ही कामगिरी आजवरच्या सर्व सरकारांच्या इतिहासात सर्वांत कमजोर अशी राहिलेली आहे. 1952 मध्ये पहिल्या निवडणुकीत हा पक्ष 364 जागा जिंकणारा होता. नेहरूंच्या तीन कालखंडांपैकी 57 मध्ये 371 आणि 62 मध्ये 361 जागा या पक्षाने जिंकल्या होत्या. 1967 नंतर इंदिराजींच्या नेतृत्त्वात चार निवडणुका झाल्या. त्यात 67 मध्ये 283, 1971 मध्ये 362, 1977 मध्ये 154 आणि 1977 मध्ये 154 अशा जागा या पक्षाला मिळाल्या. पुढे राजीव गांधी यांचे नेतृत्त्व लाभले आणि त्यांच्या दोन कालखंडांपैकी 1984 मध्ये सर्वाधिक 415 जागा या पक्षाला मिळाल्या. ही कॉंग्रेस पक्षाने संपूर्ण इतिहासात केलेली (अगदी 2014 पर्यंतचा कालखंड गृहित धरता) सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. 89 मध्ये कॉंग्रेस पक्ष 197 वर घसरला आणि 91 मध्ये पुन्हा 244 पर्यंत गेला. पी. व्ही. नरिंसहराव या कालखंडात पंतप्रधान झाले. 96 च्या निवडणुकीत कॉंग्रेस 140 वर आली. 98 मध्ये सोनिया नेतृत्त्व करण्यास पुढे आल्या आणि त्यांनी त्यात एका जागेची भर टाकत पक्षाला 141 वर आणले. 99 च्या निवडणुकीत सोनिया गांधींना केवळ 114 जागांवर समाधान मानावे लागले. हा कॉंग्रेस पक्षाचा नीचांक होता. पुढे 2004 आणि 2009 मध्ये अनुक‘मे 145 आणि 206 जागांवर हा पक्ष राहिला.

थोडक्यात सांगायचे तर कॉंग्रेस पक्षाला इतिहासातील सर्वाधिक जागा जिंकून देण्याचे काम स्व. राजीव गांधी यांनी केले, तर सर्वांत कमी जागांवर विजय मिळाल्याचा विक्रम सोनिया गांधी यांच्या नावावर आजपर्यंत होता, तो 2014 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी मोडित काढला.


अर्थ पहिला
येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कॉंग्रेसचे या निवडणुकीतील पतन अगदी अटळ होते. भ्रष्टाचार, महागाई, कमकुवत पंतप्रधान, जनतेशी तुटलेली नाळ ही सारी त्याची कारणे होती. प्रस्थापित विरोधी लाट निवडणूक जाहीर होण्याच्या कितीतरी पूर्वीच सक्रिय झाली होती. त्यामुळे मतदार यावेळी कॉंग्रेसला धडा शिकविणार, हे राजकीय पंडित जाणून होते. त्याआधारे आडाखे बांधले जात होते. मध्यंतरी भाजपाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले आणि एक सक्षम, अतिशय भक्कम नेता ती पोकळी भरून काढण्यासाठी पुढे आला. कॉंग्रेसविरोधी लाटेत जनता पोळली जात होती. पण, कॉंग्रेस नाही तर मग कोण? या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळत नव्हते. ते उत्तर मोदींच्या रूपाने मिळाले. संधींचे दोन प्रकार असतात. ती कधीकधी अनुकूलतेत मिळते, तर कधीकधी प्रतिकूलतेत. संधी नेहमीच अनुकूल व्यक्तींना मिळत असते. नरेंद्र मोदी त्याला अपवाद नाहीतच. पण, त्या संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी त्यांना देशातील कॉंग्रेसविरोधी वातावरणाची अनुकूलताही लाभली. त्यामुळेच त्यांना मिळालेल्या संधीला ते विक‘मी आणि घवघवीत यशात परावर्तित करू शकले. म्हणून या यशाकडे पाहताना मोदींच्या नेतृत्त्वाचा विजय म्हणून पाहत असतानाच कॉंग्रेसविरोधी कौल म्हणूनही पाहिले पाहिजे.

अर्थ दुसरा
भाजपा या निवडणुकीत इतकी भव्यदिव्य कामगिरी करेल, याची अपेक्षा कदाचित भाजपा नेत्यांनाही नसावी. रालोआला बहुमत मिळेल, ही आशा सर्वांनाच होती. पण, एकटी भाजपा बहुमताच्या पुढे निघून जाईल, याचा उच्चार कुणीही करीत नव्हते. कॉंग्रेसचा पराभव ही जशी काळ्या दगडावरची रेघ होती, तशीच स्वबळावर भाजपा ही शक्यताही तितकीच धूसर होती. या निकालांचा जो पहिला अर्थ आहे, तो म्हणतो की कॉंग्रेसविरुद्धची नाराजी उघडपणे पुढे आली. पण, या दुसर्‍या अर्थात मोदीत्त्व लपले आहे. कमजोर पंतप्रधान, कुणाच्या तरी इशार्‍यावर वागणारा पंतप्रधान याला जनता कंटाळली होती. मोदींचा कणखरपणा, निर्णय घेण्याची ताकद, संकट अंगावर घेण्यासाठी लागणारी जोखीम प्रवृत्ती, प्रतिकूलतेत बाळगला जाणारा संयम हे त्यांच्या गुजरातमधील मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत जनता अनुभवत होती. खरे तर त्यांचे गुण सर्वसामान्यांवर बिंबविण्यासाठी प्रसारमाध्यमांनी मोठाच हातभार लावला. मोदींना बदनाम करण्याचे जितके मोठे कारस्थान या देशातील माध्यमांनी रचले, तितके ते मोदींच्या फायद्याचे ठरले. म्हणूनच भाजपाला स्वबळावर मिळालेल्या बहुमतात नरेंद्र मोदी नेतृत्त्वस्थानी असण्याचा निर्विवाद वाटा आहे, हेही मान्य केले पाहिजे. मोदींच्या ऐवजी दुसरा कोणताही नेता पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून असता तर कदाचित ही आकडेवारी 17 मेच्या अंकात वाचता आली नसती. भाजपाच्या स्वबळावर येण्याचे श्रेय फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींनाच जाते.

अर्थ तिसरा
कॉंग्रेस पक्षाची अवस्था इतकी वाईट झाली की आता त्यांना विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मिळते की नाही, ही चिंता आहे. कारण, अवघ्या 44 जागांच्या बळावर ते 534 च्या सभागृहात कुणाचा विरोध करणार? किमान एक दशांश जागा असणार्‍या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळायला हवे, असा संकेत आहे, नियम नाही. अशात अण्णाद्रमुक आणि तृणमूल या दोनच पक्षांकडे मिळून 70 खासदार आहेत. हवे तर त्यांना ते पद कालावधी ठरवून वाटून घेता येईल. कारण, या जनादेशाचा तिसरा अर्थ हेच सांगतो की, कॉंग्रेस पक्षाला विरोधी पक्षातही बसण्याचा अधिकार नाही. ज्या पक्षाने गेल्या दहा वर्षांत (तसे 60 वर्ष) देश डबघाईस आणला त्यांनी आता विरोधी बाकांवरही न बसता काही काळ नव्या सरकारला काम करू द्यायला हवे. कॉंग्रेस पक्ष इतिहासजमा होण्याची प्रक्रिया फार पूर्वीच प्रारंभ झाली होती. येणार्‍या आणखी काही निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचे संख्याबळ 44 पेक्षाही कमी झाल्यास आश्चर्य वाटायला नको. एक मात्र नक्की, भारताला एका मजबुत पंतप्रधानाची गरज होती, ती मोदींनी भरून काढली. आता तितकाच भक्कम विरोधी पक्षनेताही असायलाच हवा. कारण, ते लोकशाही जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे. विरोधकांना यासाठी एकत्र यावेच लागेल.

अर्थ चौथा
लोकसभा निवडणुकांचे निकाल आगामी अनेक वादळांचे संकेत देणारे आहेत. यातील पहिले वादळ येऊन घोंगावेल, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर. मान्सूनच्या आगमनाची चाहूल 7 जूनपासून लागत असली तरी 2 जून रोजी महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन प्रारंभ होईल. अवघ्या महाराष्ट्रात दोन जागा घेणार्‍या कॉंग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री आणि तीन जागा घेणार्‍या राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री कोणत्या तोंडाने या अधिवेशनाला सामोरे जातील, याची कल्पना न केलेलीच बरी. जेमतेम तीन महिने हातात आहेत. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी होईल. 48 खासदार आणि 288 विधानसभेचे मतदारसंघ, ही महाराष्ट्राची भौगिलिक रचना. साधारणपणे एका लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. केवळ गणिताच्या भाषेत सांगायचे तर 288 पैकी 258 मतदारसंघ महायुतीकडे येतात. अर्थात प्रत्यक्ष निवडणुकीत असे होत नसते. कारण, मनसेसारखा प्रादेशिक पक्षही रिंगणात असेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे विषयही वेगवेगळे असतात. एक मात्र नक्की की हे वादळ महायुतीची सत्ता महाराष्ट्रात स्थापन करणार आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर इतरही अनेक राज्य भाजपाला आपल्या अधिपत्यात घेण्याची एक नामी संधी प्राप्त झाली आहे.

अर्थ पाचवा
एक प्रश्न सामान्यपणे पडतो, तो केंद्रातील या नव्या सरकारपुढे आव्हाने काय? महागाई कमी करणे, भ्रष्टाचार संपविणे, सर्वसामान्यांचे जिणे सुकर करणे, ही प्रमुख आव्हाने असली तरी त्याहीपेक्षा मोठे ओझे हे अपेक्षांचे असेल. अनागोंदी कारभाराला, भ्रष्टाचाराला आणि महागाईला कंटाळालेला सामान्य माणूस या सरकारकडून अचानकपणे मोठ्या अपेक्षा करायला लागेल. त्या अपेक्षांची पूर्तता क्षणात व्हावी, अशी त्याची अपेक्षा राहणार आहे. या देशातील सार्‍याच समस्या लगेचच संपल्या पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असणार आहे. नोकर्‍या, आर्थिक भरभराट, सुराज्य अशा कितीतरी असंख्य कल्पना लगेचच साकारणे शक्य नसते. पण, सरकारची कार्यपद्धती हा काही सामान्य आकलनाचा भागही नसतो. त्याला झाड लावले की लगेच फळे हवी असतात. अर्थात महागाई कमी करणे, ही प्रामाणिक अपेक्षा मतदारांची असणार आहे.

अर्थ सहावा
या निकालांनी देशाच्या राजकारणात आगामी काळात अनेक भूकंप घडणार आहेत. हे भूकंप किती मोठे असतील आणि कोणकोणत्या राजकीय पक्षात होतील, हे आजच सांगता येणे कठीण आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये अनेक नेते आता सुरक्षित जागा शोधण्याचा प्रयत्न करतील. भाजपाकडे ओढा असणारे अनेक नेते असतील. नीतीशकुमार यांच्या राजीनाम्याने पहिला भूकंप झाला आहेच. असे अनेक भूकंप पुढच्या फार फार तर तीन महिन्यात होणार आहेत.

अर्थ सातवा
या निकालांचा सर्वांत महत्त्वाचा अर्थ जाणवतो, तो म्हणजे देशातून जे हद्दपार होत नव्हते, ते जाती-पातीचे, धर्माचे विषारी राजकारण दूर सारण्याचा प्रयत्न या निवडणुकीने केला आहे. आमचा विकास, आमचे जगणे जो सुकर करू शकतो, असा पर्याय मतदारांनी मोठ्या मनाने निवडला आणि तोच विश्र्वास भाजपाला सार्थ करून दाखवायचा आहे. नागपुरात नितीन गडकरी निवडून आले, त्यानंतर नितीन राऊत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्या राजीनामा पत्रात कॉंग्रेसच्या पराभवाची जबाबदारी कमी आणि रा. स्व. संघाचे आजीवन सभासद असलेले गडकरी निवडून आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ उद्देशाला बाधा पोहोचल्याची तक्रार अधिक आहे. ज्या संविधानाने लोकशाही अधिक बळकट केली आणि त्याच संविधानाचे निर्माते म्हणून आपण सारे अतिशय आदराने त्यांच्याकडे पाहतो, अशा डॉ. आंबेडकर यांची लोकशाहीच अमान्य करणार्‍या प्रवृत्ती या निवडणुकीत नामशेष झाल्या, हे अतिशय आवश्यक आहे. मुस्लिम समाजानेही भाजपावर विश्र्वास दाखविला. धर्मनिरपेक्षतेचे गोंडस नाव घेत िंकवा जाती-पातीचे राजकारण करीत समाजात कायम फूट पाडणार्‍या कॉंग्रेस पक्षाला त्यांची जागा या निकालांनी दाखवून दिली. यापेक्षा देश कितीतरी पटीने अधिक महत्त्वाचा आहे, हे मतदारांनी दाखवून दिले, हा या निकालांचा सर्वांत मोठा आणि मोलाचा अर्थ आहे.