युवराजांना शुभेच्छा

rahul-gandhi
(जानेवारी 2014 मध्ये प्रकाशित)

टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीला सोमवारी दिलेल्या मुलाखतीत, कॉंग्रेसच्या घराणेशाहीतून रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत आलेल्या राहुल गांधी यांना ऐकताना, पाहताना बर्‍यापैकी विरंगुळा झाला. नेत्याचे गुण ते प्राप्त करीत असल्याचे कौतुकही वाटत होते आणि परिपक्वता अजूनही बर्‍यापैकी दूर आहे, याचाही आभास होत होता. गुजरातच्या दंगलीत एसआयटीकडून क्लीन चिट मिळूनही नरेंद्र मोदी हे दोषीच आहेत, हे सांगत असताना अशोक चव्हाणांविरुद्ध खटल्याची परवानगी राज्यपालांकडे मागूनही ते कसे निर्दोष आहेत, हे बिंबविण्याचा प्रयत्न राहुल गांधी करीत होते. अशोक चव्हाणांचा उल्लेख अशोककुमार असा होत असला, तरी जणू त्या प्रकरणातील संपूर्ण बारकावे आपल्याकडे आहेत, असा त्यांचा सूर दिसत होता. नेत्याने मारल्यासारखे करायचे आणि चुकणार्‍या कार्यकर्त्याने ओरडल्यासारखे दाखवायचे, हा राजकारणातील मूलभूत गुण आहे. सत्तेत असताना असे दाखवावेच लागते. तरच ती दीर्घकाळ टिकते, असा आजवरचा कयास होता. गुजरातच्या न्यायप्रणालीवर विश्वास नाही आणि महाराष्ट्रातील न्यायप्रणाली उत्तम आहे, असा अर्थ त्या मुलाखतीतून ध्वनित होत होता. अर्थात हा न्यायालय अवमानाचा विषय कधीही होणार नाही. राजकारणात सोयीचे राजकारण हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची भाषा करणार्‍यांनी लालूप्रसाद यादवांसोबतच्या युतीचे समर्थन करावे, हेच तर खरे राजकारणाचे धडे आहेत. त्या अर्थाने राहुल हळूहळू नेतेपदाकडे जात असल्याचे स्पष्ट होते.

माहितीचा अधिकार राजकीय पक्षांना का लागू नये, याचे समर्थन करताना लोकशाहीच्या चारही स्तंभांना तो लागू होत नाही, हे बिंबविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. खरे तर न्यायपालिका, कार्यपालिका यांना माहिती अधिकार लागू आहे. माध्यमे देश चालवत नाहीत, त्यामुळे त्यांना तो लागू होण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. पण, राजकीय पक्ष हे सत्तेत येत असतात, ते मिळूनच विधिपालिका तयार होते, हे राहुल गांधींना कळू नये, हे एक कोडेच आहे. १९८४ ची शीखविरोधी दंगल आणि गुजरातमध्ये झालेली दंगल या दोन्ही भिन्न कशा आहेत, हेही दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला. गुजरात दंगल जेव्हा केव्हा होते, तेव्हा ५६ कारसेवकांना जाळून मारल्याचा उल्लेख कुणीच करीत नाही, हाही दुटप्पीपणाच असतो. पण, राजकारणात असेच वागायचे असते. असे वागता आले तरच मोठा नेता होता येते. राहुल यांनी हे प्रारंभिक धडे गिरविणे ज्या पक्षात प्रारंभ केले, तो त्यांचा भव्य असा इतिहास आहे. मुलाखती सोप्या असतात, राज्य करणे कठीण असते. केजरीवालच्या वाटेवर चालणार्‍या राहुल गांधी यांना भरपूर शुभेच्छा!

राजा अमेठीचा

राजकारण करताना केवळ बोलून नाही, तर कृतीनेही भरपूर गोष्टी साधायच्या असतात. अनेक राज्यांत अनेक प्रकारची दडपशाही होत असते. कधी ती विकासाच्या बाबतीत होते, तर कधी राजकीय बाबतीत. त्या राज्यातील नेतृत्व किती कचखाऊ आहे, यातून हे साधता येत असते किंवा नसते. आसाम हे असेच एक राज्य. या देशाचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना आजवर कधीही लोकसभेत निवडून येता आले नाही. तरीही ते या देशाचे पंतप्रधान झाले. राज्यसभा हा सर्वात सोपा मार्ग. नेत्याने फक्त नाव ठरवायचे आणि त्या राज्यातील त्यांच्या अनुयायांनी चुपचाप त्यांना मतदान करायचे, असा हा प्रवास. त्याच राज्यातून अर्थात आसामातून अमेठीचा राजा पुन्हा राज्यसभेत डोकावणार आहे. संजय सिंग हे त्याचे नाव. संजय सिंग हे सुलतानपूरमधून लोकसभेत निवडून आलेले खासदार. पण त्यांच्या निवडणुकीला अरविंद केजरीवाल यांच्या कंपूतील कविनेते कुमार विश्वास यांनी आव्हान दिले. त्यामुळे खासदारकी धोक्यात आली. ती जाण्याच्या आत त्यांना पुन्हा नवीन खासदारकी प्रदान करण्याचा केविलवाणा प्रयत्न युवराजांकडून होत आहे. अमेठीत राहुलबाबांचे निवडून येणे कठीण आहे. कुमार विश्वास यांनीच त्यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. आता अमेठीतील एकेक नेता आपल्या बाजूने वळविणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच संजय सिंग यांना राज्यसभेत पाठविण्याचा अट्टहास. संजय सिंग हे तसे संजय गांधी यांचे निवटवर्तीय. त्यांच्याचमुळे ते राजकारणात आले. त्यांना केंद्रात मंत्री व्हायचे होते, पण होता आले नाही. अशात ते नाराज आहेत. भाजपाशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न करताहेत. भाजपा त्यांना आपल्या विरोधात रिंगणात उतरवू शकते, याची पुरती कल्पना त्यांना आलेली आहे. एकीकडे संजय सिंग आणि दुसरीकडे कुमार विश्वास अशा ध्रुवीकरणात आपण पराभूत झालो तर? या भीतीने राहुल गांधी यांनी त्यांना राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय घेऊन टाकला. आता भाजपाला स्थानिक प्रतिस्पर्धी मिळणार नाही, याची त्यांना खात्री पटली आहे. नेतेपदाचा डाव तर टाकला. पण, परिपक्वता कमीच आहे.माजी राष्ट्रीय बॅडमिंटनपटू अमिता सिंगचे पती असलेले संजय सिंग हे १९९८ मध्ये भाजपासोबतच होते. अमेठीतून ते जिंकलेही होते. पण, ९९ च्या निवडणुकीत पुन्हा पराभूत झाले. २००३ मध्ये त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. आता त्यांना राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय घेऊन मोकळा श्वास घेण्याचा केविलवाणा प्रयत्न कॉंग्रेस करीत आहे. यातून कॉंग्रेसच्या युवराजाचा विजय सुनिश्‍चित होईल की भाजपा अंतिम क्षणी कुणाला येथून उमेदवारी देईल, हे आजतरी सांगता येणे अशक्य आहे. पण, संजय गांधींच्या एकनिष्ठांशी जुळवून घेण्याची पाळी आली, यातूनच त्यांची हताशा लक्षात येते. या नैराश्याचे अंतिम रूप मे २०१४ मध्ये दिसेलच.