(मे 2014 मध्ये प्रकाशित)
या देशातील विद्वानांमध्ये शिक्षणातील असमानतेची एक मोठी दरी अजूनही कायम आहे. आपल्या शिक्षणप्रणालीचा गुरुकुल पद्धतीपासून ते अगदी परदेशी विद्यापीठांपर्यंतचा प्रवास झाला आहे. प्रमाणपत्रांच्या आधारावर उच्च पदं प्राप्त करून आयुष्याच्या शेवटी अपयशाच्या खोल गर्तेत जाणार्यांची संख्या कमी नाही. त्याचवेळी प्रमाणपत्र जवळ नसतानाही त्या क्षेत्रातील तज्ञतेच्या जोरावर असामान्य कामगिरी करणारे अनेक रत्न या देशात होऊन गेले, सध्याही आहेत आणि येणार्या काळातही होत राहतील.होय, स्मृति इराणी यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा पदभार दिल्यानंतर देशात एक मोठी चर्चा प्रारंभ झाली. बारावी झालेली व्यक्ती देशाचे शैक्षणिक धोरण ठरवू शकते काय? प्रश्न तसा रास्त आहे. पण, गेल्या 60 वर्षांत जे तथाकथित उच्चशिक्षित या खात्याला लाभले, त्यांनी या देशाच्या शिक्षणप्रणालीत किती संस्कार रूजविले, हा प्रश्न सोयीस्करपणे दूर सारला जातो. शिक्षितांच्या मांदियाळीत किती सुशिक्षित आहेत, याचे उत्तर कुणी देत नाही आणि त्याचाच उहापोह या वादाच्या केंद्रस्थानी असला पाहिजे. या एका प्रश्नाच्या उत्तरातून अनेक प्रश्न आपोआप सुटणार आहेत.
व्यक्तीच्या शिक्षणाशिवाय देशाच्या शिक्षणाची दशा कशी काय स्पष्ट होईल, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. विशेषत: केवळ शहरात वार्तांकन करणारे आणि इंग्रजी वर्तमानपत्रात काम करणार्यांना हे प्रश्न अधिक भेडसावतात. त्यांना 30 टक्के शहरी भारत जागतिक महाशक्ती वाटतो. कारण, 70 टक्के ग्रामीण भारतात ते कधी गेलेलेच नसतात. एखादा परदेशातून शिकून आलेला आता आपले भाग्य बदलणार, याच आशेवर ते कायम जगत असतात. स्मृति इराणी यांनी कित्येक वर्ष पक्षातील संघटनात्मक पातळीवर काम केले आहे. पक्षाने त्यांच्या क्षमता ओळखूनच त्यांना ही जबाबदारी सोपविली आहे. जगाच्या पाठीवर पहिल्यांदाच असे काही होते आहे, असेही नाही. पदवीधर मतदारसंघात मतदार पदवीधर असावा लागतो, पण उमेदवार पदवीधर असलाच पाहिजे असे नाही, हे का उगाच सांगितले जाते?प्रमाणपत्राद्वारे प्राप्त होणारे शिक्षण हेच खरे शिक्षण असते, हा एक मोठा भ्रम आहे. शिक्षणातून जे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर िंवबविले जावेत, तसे आज अजीबात होत नाही.
शाळेतील शिक्षक आपली नोकरी टिकविण्यासाठी विद्यार्थी शोधत घरोघर फिरतो, प्राध्यापक प्रॅक्टिकलचे मार्क देण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत पार्ट्यांना बसतो, एवढेच काय लांगूलचालन करून कुलगुरुंच्या नियुक्त्या होतात, याच कुलगुरुंमधून दिल्ली कनेक्शनवाले विद्यापीठ अनुदान आयोगात जातात आणि तेथून ते नियोजन आयोगात जातात. डिग्रीच्या भरवशावर हे दृष्टचक्र कॉंग्रेसच्या शिक्षित मंत्र्यांनी तयार केले. आता ते भेदण्याची गरज आहे.शिक्षण नसताना आणि केवळ संस्कारांमुळे, ध्येयवादामुळे, स्वत:च्या चिकित्सक वृत्तीमुळे अनेक थोर लोक घडले आहेत. त्यांची यादी भलीमोठी आहे. विस्टर्न चर्चिल यांनी शालेय शिक्षणानंतर थेट लष्करात प्रवेश केला आणि असामान्य कामगिरीमुळे ते ब्रिटनमधील सर्वांचे चाहते नेते बनले. जॉर्ज वॉिंशग्टन यांनी वडिलांच्या आजारपणामुळे शाळा सोडली आणि कामाला लागले. पुढे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. अब्राहम िंलकन यांनी स्वत:चा अभ्यास स्वत:च केला. ते कोणत्याही शाळेत गेले नाही. पण, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदापर्यंत त्यांना मजल मारता आली. ख्रिस्टोपर कोलंबसने शिक्षण न घेताही अमेरिकेचा शोध लावला. जॉर्ज इस्टमन यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी शिक्षण सोडले. पण, वयाच्या 38 व्या वर्षी कोडॅक कंपनी स्थापन केली. आज बहुतेक सारे याच कंपनीचे कॅमेरे हाती घेतात. थॉमस एडिसन यांना त्यांच्या शिक्षकाने शाळेतून हाकलून लावले. पण, त्यांनी इलेक्ट्रीक बल्ब आणि अनेक गोष्टींचा शोध लावला. बेंजामिन फ्रँकलिन यांनी केवळ वयाच्या दहाव्या वर्षीपर्यंतच शाळा शिकली. पण, लाईटिंनग रॉड आणि बायफोकल ग्लासेसचा त्यांनी शोध लावला. लिओ टॉलस्टॉय हे विद्यापीठ शिक्षणात नापास झाले. पण आज रशिया त्यांना जगातील आघाडीच्या कांदबरीकारांमध्ये सर्वोच्च स्थानी पाहते. जेन ऑस्टीन यांना घरच्या परिस्थितीमुळे शाळा सोडावी लागली. पण, पुढे ते ‘इंग्लिश क्लासिक’चे लेखक बनले. विल्यम शेक्सपिअर यांनी कुठल्याही प्रकारचे शिक्षण घेतले नाही. पण, आज इंग्रजी साहित्य वाचणारे कुणीही त्यांचा परिचय विचारत नाही. बिल गेट्स यांनी विसाव्या वर्षी शिक्षण सोडले. आज ते मायक्रोस्फॉटचे मालकच नाहीत तर जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. अॅपलचे स्टीव्ह जॉब्स, वॉल्ट डिस्ने, रिचर्ड ब्रान्सन अशी कितीतरी नावे या श्रेणीत येतात.असे कर्तब आंतरराष्ट्रीय पातळीवरच होऊ शकतात, असे नाही. पण, त्यांची नावे अग्रक्रमाने देण्याचे कारणच मुळी हा प्रश्न भारतीय संस्कृतीशी समरस नसलेल्या व्यक्तींना पडला आहे. ही नावे कदाचित त्यांच्या अधिक परिचयाची असू शकतात.
आपल्या संस्कृतीत तर अशी कितीतरी मोठी नावे आहेत. ज्ञानेश्वरी रचणारे संत ज्ञानेश्वर असोत की, संत गुलाबराव महाराज, ग्रामगिता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असोत की अगदी कालपरवापर्यंत आपल्यासोबत असणारे संत अच्युत महाराज. यांनी कोणते शिक्षण घेतले? पण, शिक्षितांपेक्षा ते अधिक सुशिक्षित होते. पण, समाजासाठी त्यांनी काय नाही केले? आजही एमएस्सी अॅग्रीकल्चर झालेला विद्यार्थी जेव्हा खेड्यातील एखाद्या शेतकर्यापुढे उभा होतो, तेव्हा खरा ज्ञानी, खरा सुशिक्षित तो शेतकरीच असतो. हा डिग्री मात्र त्याच्याकडे नसते. पंतप्रधान इंदिरा गांधी तरी कुठे शाळेत गेल्या. त्यांनी घरच्या घरी शिकवणी वर्गाच्या माध्यमातून शिक्षण घेतले. विश्वभारती, ऑक्सफर्डसारख्या विद्यापीठांमध्ये त्यांनी प्रवेश घेतले. पण, ते कधीच पूर्ण केले नाही. पण, भारतातील यशस्वी पंतप्रधानांच्या यादीत त्यांचे नाव घेतले जातेच ना? मोदींच्या प्रचार काळात ज्यांच्यावर बोट ठेवले गेले, ते गौतम अदानी हेही बारावीच आहेत. बीकॉमला त्यांनी प्रवेश घेतला खरा. पण, शिक्षण अपूर्णच राहिले. धीरूभाई अंबानी केवळ शाळेतच शिकले. सोळाव्या वर्षी त्यांनी शाळा सोडली. पण, त्यांच्याच काळात रिलायन्स ही भारतातील सर्वांत श्रीमंत कंपनी बनली. क्रिकेटच्या मैदानावर नाव गाजविणारा सचिन तेंडुलकर तरी कुठे शिकला आहे. पण, जगातील आघाडीचे क्रिकेटपटू त्याच्यापुढे नतमस्तक होतात. भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार महेंद्रिंसग धोनी. शिक्षण केवळ बारावी. पदवीला कधी बसलाच नाही. पण, आज एका यशस्वी कर्णधारच नाही तर टाईम मासिकाने त्याची जगातील सर्वाधिक प्रभावशाली शंभर व्यक्तींमध्ये निवड करून टाकली. एवढेच कशाला इंग्रजी वर्तमानसृष्टीतील आघाडीचे नाव प्रितीश नंदी. द इलिस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया, द ऑब्झर्व्हर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्स, द संडे ऑब्झर्व्हर अशा कितीतरी वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन करणारा, टीव्हीच्या जगतात अनेक प्रकारची निर्मिती करणारा प्रितीश नंदी तरी कुठे पदवीधर आहे? सुभाष चंद्रा यांनी बारावीची परीक्षा देण्याऐवजी तेलनिर्मिती प्रारंभ केली. पुढे एस्सेल वर्ल्डची निर्मिती केली. त्यानंतर झीच्या माध्यमातून ते टीव्हीच्या जगतात प्रवेश करते झाले. आज 34 वाहिन्या आणि 168 देशांत ते आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून पोहोचले आहेत. अजूनही विनोद गोयनका वगैरेंची मोठी यादी येथे देता येईल. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे किती शिकले होते. पण, खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचा अध्यादेश काढण्यात त्यांचाच पुढाकार होता. आज त्यांच्या नावाने किती मोठे शैक्षणिक साम्राज्य उभे आहे?
थोडक्यात काय तर शिक्षण हे जीवनातील महत्त्वपूर्ण अंग आहेच. पण, ते विकासाचे एकमेव अंग नाही. इच्छाशक्ती, आत्मविश्वास, काही तरी करून दाखविण्याची जिद्द याच्या आड ते कधीही येत नाही. शिक्षण माणसाचं व्यक्तिमत्त्व फुलवते. पण, ते प्रमाणपत्राच्या आधारे मापता येत नाही. तितकेच वाचन, मनन, ि’चतन तुमचे असेल आणि केवळ प्रमाणपत्राची साथ नसेल याचा अर्थ ती व्यक्ती अक्षम आहे, असा समज करून घेणे, हाच मुळात आपले शिक्षण किती कमकुवत आहे, हे दाखविण्याचा प्रकार आहे. या दिग्गजांसोबत स्मृति इराणींची तुलना करण्याचा येथे कुठलाही हेतू नाही. पण, त्यांना केवळ प्रमाणपत्राच्या अभावी कमी लेखणार्यांना थोडे सुशिक्षित करण्याचा प्रयत्न जरूर आहे.