चार स्तंभांची एक-नाळ !

जवळजवळ आठ वर्षांनी स्वत:साठी लिहिण्याचा योग आलाय्. सरकारनामाने एका वेगळ्या विषयाच्या निमित्ताने ही संधी दिली, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. पत्रकारितेत पाऊल ठेवले, ते ज्येष्ठ संपादक ल. त्र्यं. जोशी यांनी संधी दिल्याने. तत्पूर्वी ‘संपादकांना पत्रे’ किंवा ‘वाचकांचे मनोगत’ सारखे लेखन होत असायचे. अशाच एका भेटीत अक्षरं आणि भाषा आवडल्याने थेट नोकरीचा प्रस्ताव आला. पदवीचं शिक्षण पूर्ण व्हायचे असल्याने तो नाकारला. वर्षभराने शेवटच्या वर्षीचा शेवटचा पेपर आटोपून परतत नाही, तोच पुन्हा त्याच प्रस्तावासह फोन आला. मग नाही म्हणण्याचा प्रश्नच निर्माण होत नव्हता. पण, पुढची आव्हानं ठावूक नव्हती.

लिहिता येणं आणि शुद्ध-मोजक्या शब्दांत लिहिता येणं, घडलेलं नमूद करून वृत्तांकन करणं आणि पत्रकारितेतून थेट समाजाला दिशा देता येणं, समाजातील विविध विषयांचा मागोवा घेत त्यातून जनतेचे प्रश्न मांडता येणं, नुसतं प्रश्न मांडून उपयोग नाही, तर त्याची उत्तरं सुद्धा शोधता येणं, यातील अंतर कळत जात मग विकास होत गेला. अगदी खरं सांगायचं तर राजकारण मला कधीच आवडले नाही आणि आजही आवडत नाही. म्हणून राजकारण ‘बीट’ (प्रत्येक वार्ताहराला त्याच्या कार्यालयाने नेमून दिलेले क्षेत्र) मी स्वत:ला कधी चिकटू दिले नाही. विद्यापीठ आणि हायकोर्ट, अर्थात शिक्षण आणि कायद्याचे क्षेत्र अशा दोन क्षेत्रातच पत्रकारिता केली. मग हळूहळू मुख्य उपसंपादक, वृत्तसंपादक असा 22 वर्षांचा प्रवास करीत अचानक व्यवस्थापनात काम करण्याचा प्रस्ताव आला आणि दोन वर्ष संस्थेच्या सीईओपदाची धुरा सांभाळण्याचीही संधी मिळाली. हा काळ होता, नव्वदीपासून ते 2014 पर्यंतचा.

राजकारणाकडे फार चांगल्या दृष्टीने मी कधीच पाहिले नाही आणि आजही पाहत नाही. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. तसे यालाही अपवाद होतेच. पत्रकारितेच्या बाबतीत सांगायचे तर सुदैवाने मला अशा संस्थेत प्रदीर्घ काम करण्याची (आयुष्यात नोकरी कधी बदललीच नाही) संधी मिळाली की तेथे पत्रकारितेच्या साधनशूचितेचा कायम आग्रह असायचा. अगदी लिहिण्यातील र्‍हस्व-दीर्घापासून ते विरोधी पक्षाच्या बातमीत कुठेही मतप्रदर्शन न करण्यापर्यंतचा. त्यामुळे वैचारिक बाबतीत अंतर असले परस्पर विचारांचा सन्मान करण्याचे धडे आपसुकच मिळत गेले. एक नक्की की ज्या काळात आम्ही पत्रकारिता केली त्याकाळात पत्रकार म्हणूनच ओळख होती, कार्यकर्ता म्हणून नाही. त्यामुळे प्रत्येकच पत्रपरिषदेत किंवा कार्यक्रमांमध्ये पत्रकार म्हणूनच आमच्याकडे पाहिले जाई. ताठ मानेने गावांत पत्रकार म्हणून फिरण्यात जो आनंद होता, तो आजही अवर्णनीय आहे.

राजकारणाबाबत फार चांगले मत नसतानाही राजकारणाच्या पलिकडे काम करणारे नेते असतातच, त्यांच्याबद्दल कायम आकर्षण असायचेच. स्व. अटलबिहारी वाजपेयी, प्रा. ना. स. फरांदे, धरमचंद चोरडिया, अगदी नागपूरचे म्हणाल तर ए. बी. बर्धन, सरदार अटलबहादूरसिंग अशा अनेक अभ्यासपूर्ण नेत्यांविषयी आकर्षण वाटायचे. त्यांना ऐकणे ही पर्वणी असायची. नागपुरात त्या काळात शहराचा भारनियमनाचा प्रश्न असो, अनुशेषाचे प्रश्न असोत, झोपडपट्टीवासियांसाठी संसदीय आयुधांचा वापर करीत विनंती अर्ज समिती नावाचे आयुध लोकप्रतिनिधींना माहिती करून देणारे असोत, किंवा कोणत्याही विषयावर अगदी अभ्यासपूर्ण मांडणी करणारे देवेंद्र फडणवीस हे एक वेगळे रसायन आहे, ते पारंपारिक राजकारणाच्या मांदियाळीतील नाहीत, तर सामाजिक, वैचारिक अधिष्ठान असणार्‍यांपैकी एक आहेत, हे त्या काळात मी डोळ्याने पाहत होतो. मग असेही प्रसंग यायचे की, त्यांचे भाषण ऐकायला विधानसभेच्या गॅलरीत मध्यरात्री 1 नंतर मी एकटाच असायचो. विधानसभेत स्वत: देवेंद्र फडणवीस, उत्तर द्यायला एक मंत्री, एक पीठासीन अधिकारी आणि पत्रकार गॅलरीत मी असे कितीतरी प्रसंग नागपूर अधिवेशनादरम्यान रात्री उशीरा यायचे. (देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्याने त्यांच्या अर्धा तास चर्चा मध्यरात्रीनंतर सुद्धा लागल्या तरी चालतील, असे तेच सांगायचे).

एका विषयाचा किती अंगांनी अभ्यास करता येऊ शकतो, हे मी निरीक्षणातून त्यांच्याकडून शिकत होतो आणि आपसुकच एक नाते तयार झाले. विधानसभेतील भाषणांव्यतिरिक्त सिनेटमध्ये सुद्धा ते तसेच बोलत. नागपूर विद्यापीठाच्या सिनेटमध्ये अन्यथा डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या भाषणांतून भरपूर माहिती मिळत असे. एका कामानिमित्त नागपूरचे तत्कालिन नगरसेवक संदीप जोशी यांच्या माध्यमातून माझा आणि देवेंद्रजींचा परिचय झाला आणि पुढे तो वाढत गेला. साधारणत: ते मुख्यमंत्री होण्याच्या 10-12 वर्षांपूर्वीचा हा परिचय. मग पुढे विविध कारणांनी भेटींचा सिलसिला होत राहिला. मात्र आपल्याला वैचारिकदृष्ट्या जी व्यक्ती आवडते, त्याच व्यक्तिसोबत आयुष्यात कधी काम करायला मिळेल, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. अर्थात देवेंद्रजी सोडून दुसर्‍या कुणासोबत काम करण्याचा प्रश्नही निर्माण होत नव्हता.

2014 मध्ये आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि सोबत काम करण्याचा प्रस्ताव चर्चिला गेला. देवेंद्रजी यांच्या वैचारिक क्षमतेबाबत, प्रत्येक क्षेत्रात असलेल्या अभ्यासाबाबत, अफाट ज्ञानसंपदेबाबत एव्हाना माझी चांगली ओळख झाली होती. पण, पत्रकारितेचेही त्यांना इतके सखोल ज्ञान आहे, हा अनुभव मात्र त्यांच्यासोबत काम करतानाच झाला. बातमी, बातमीचा मथळा, बातमीचा इन्ट्रो, शब्दयोजना इत्यादींचे संपूर्ण ज्ञान त्यांना आहे. कोणती बातमी भविष्यात कुठे जाणार किंवा कोणत्या बातमीचे उगमस्थान कोणते असावे, याची त्यांना संपूर्ण माहिती असते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना अतिशय सतर्कतेने काम करणे अपेक्षित असते. माध्यमं त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने कळतात. मी तर असेही म्हणेन की आयुष्यात मला पत्रकारिता दोनदा शिकता आली. पत्रकारितेत राहूनही आणि बाहेर राहूनही. अलंकारिक किंवा चपखल लिखाणातही त्यांचा हातखंडा आहे. प्रत्येक बाबतीत ते ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आहेत. अनेकदा एखाद्या वाक्यावर तीन-तीनदा खल होतो आणि जोवर त्यांच्या मनाला एखादी गोष्ट भावत नाही, तोवर समाधान नसते. प्रत्येक बातमीची फार दखल घेतातच किंवा अजीबात घेत नाही, असे दोन्हीपैकी हमखास काहीच नाही. अनेकदा आम्ही अस्वस्थ होतो. पण, त्यांना ती बातमी कुठे जाणार, हे कळते आणि त्यामुळे ते निश्चिंत असतात. जी खरोखर बातमी आहे, ती कितीही विरोधातील असू द्या, त्याची दखल घेऊन ते संबंधित विभागाला त्याची दखल घेण्यास सांगतात. कागदी वर्तमानपत्रांचे वाचन अलिकडे कमीच झाले आहे. पण, प्रवासात त्याच वर्तमानपत्रांचे डिजिटल वाचन मात्र होत असते.

आज काळानुरुप बातमीचे स्वरूप फार बदलत चालले आहे. जेथे बातमी असते, ती बातमीत नसते आणि ज्यात बातमीसारखे काहीच नसते तीच सर्वांत मोठी बातमी असते. परिणामी कामाचे स्वरुप सुद्धा बदलत चालले आहे. यात सर्वांत काही हरवत चालले असेल, तर ती विश्वसनीयता! अगदी कुठेही बातमी आली तरी जोवर व्यक्तिगत पातळीवर त्याची पडताळणी करीत नाही, तोवर विश्वास ठेवायचा नाही, असा दंडक अलिकडे होत चालला आहे. एखादे विधान वाचून चालत नाही, तर ऐकूनच त्यावर मत बनवावे लागते, हे अतिशय घातक आहे. कारण, ज्या परिस्थितीत किंवा ज्या संदर्भाने नेत्याने विधान केले असते, वाचण्यातून त्याचा संदर्भच नष्ट होतो. दुरुन पाहताना ही खूप गंमत वाटते. जे प्रश्न आपण विचारले, त्यानुषंगाने हे स्पष्टपणे सांगू शकतो, की अशा कुठल्याही न ऐकलेल्या विधानावर देवेंद्रजी कधीच प्रतिक्रिया देत नाहीत. माहिती नसेल तर थेट तसे सांगतात. कुठल्या घडलेल्या घटनेवर सुद्धा प्रतिक्रिया द्यायची असेल तर ती परंपरागत धाटणीतील कधीच नसते. संबंधितांशी बोलल्याशिवाय, संपूर्ण परिस्थिती समजून घेतल्याशिवाय ते कधीच प्रतिक्रिया देत नाहीत. एखादी क्रियात्मक प्रतिक्रिया दिली असेल तर ते संबंधितांना तसे कळवितात सुद्धा की, मी अमूक प्रतिक्रिया दिली आहे, त्यानुरुप कार्यवाही झाली पाहिजे.

त्यांची स्वत:ची संपर्क यंत्रणा अतिशय भक्कम आहे. त्यामुळे बातमी कुठे यायच्या आत त्यांच्यापर्यंत पोहोचली असते, असाच अनुभव अनेकदा येतो. एक बाब प्रकर्षाने सांगितली पाहिजे, ती म्हणजे त्यांच्या ठायी असलेली कमालीची सकारात्मकता. कुणी कितीही विरोधात बातम्या केल्या, तरी त्यांच्याशी त्यांची असलेली निखळ मैत्री, त्याचेच परिचायक आहे. माध्यमांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन कायम सकारात्मक राहिला आहे. म्हणूनच पत्रकारांची पेन्शन, सुरक्षेचा कायदा, गृहनिर्माणाचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न त्यांनी खितपत ठेवले नाही, तर सारेच्या सारे सोडवून दाखविले. एखादी बातमी का दाखविली, यासाठी त्यांचा फोन कधीच नसतो. केलाच तर तो आमची बाजू का घेतली नाही, हे जाणून घेण्यासाठी. पत्रकारितेतून नैसर्गिक न्यायाचे हे तत्त्व आज हरवत चालले आहे, ही फारच मोठी शोकांतिका आहे. बातमीची खातरजमा करणे आणि संबंधितांची प्रतिक्रिया घेऊनच ती देणे, हा पूर्वी पत्रकारितेचा दंडक असे. पण, दुर्दैवाने आज तो नाही.

पत्रकारितेच्या या बदलत्या संदर्भानेच समाजमाध्यमांना बळ दिले आहे. उदाहरणार्थ मला एखाद्या नेत्याचे अधिकृत वक्तव्य पहायचे असेल तर त्यांच्या समाजमाध्यम खात्यावर ते जाऊन सहज, चटकन आणि कितीही वेळ पाहता येते. त्यामुळे ज्या विषयात आपल्याला रुची आहे, ते विषय फॉलो करीत सहज अपडेट राहता येते. जगाचेही प्रवाह तेच आहेत. मनोरंजन विश्वातील बातम्या इन्स्टाग्रामवरून येतात, राजकारणातील ट्विटरवरून तर ग्रामीण भागातील बातम्या फेसबुकवरून. संपर्काचे प्रभावी माध्यम म्हणून व्हॉटसअ‍ॅप/टेलिग्रामकडे पाहिले जाऊ लागले. शिवाय आपल्या नेत्याचे भाषण आता कुणी दाखविले किंवा न दाखविले काय, समाजमाध्यमांतून ते घराघरात जात असते. शिवाय नोटिफिकेशनमुळे सतत ते ऑन ठेवायची गरज नाही. त्यामुळे निश्चितपणे भावी काळात समाजमाध्यमाच्या कक्षा अधिक रुंदावत जाणार आहेत.

अभिव्यक्तीचे सर्वांत प्रभावी माध्यम म्हणून सुद्धा समाजमाध्यमांकडे पाहिले जाऊ लागले आहे. मला काय वाटते, यावर मुद्रीत, चित्रित माध्यमांत जागा मिळो अथवा न मिळो, कुणीही आपल्या खात्यात थेट लिहू शकतो किंवा व्हीडिओ सुद्धा पोस्ट करू शकतो. विशेषत: ओटीटीमुळे सर्वच प्रकारच्या वाहिन्यांची प्रेक्षक संख्या रोडावत असताना या माध्यमांकडे विशेष लक्ष देण्याचाच संवादइच्छूकांचा सर्वाधिक ओढा असतो.

सरतेशेवटी व्यासपीठ कोणतेही असो, माध्यमाचे असो की मनोरंजनाचे असो, प्रेक्षक तेथे खिळून राहिला पाहिजे, हेच प्रत्येकाचे लक्ष्य असते आणि असावे. मात्र अशात ते माध्यम विश्वसनीयता गमावत असेल, एकांगी असेल, उथळ असेल, सनसनाटी असेल असे तेथे प्रेक्षक संख्या अत्यल्प होण्याचा मोठा धोका असतो. प्रेक्षकाला बातमीची भूक असते, पण ती निरपेक्ष हवी असते, प्रेक्षकांना ज्ञानाची भूक असते, पण ते विविधांगी हवे असते. एकांगी भूमिकेचा कदाचित क्षणिक काही काळ फायदा होतो. पण, दीर्घकालीन ते नुकसानदायीच असते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. ज्यांनी हे लक्षात घेतले नाही, असे अनेक काळाच्या प्रवाहात नामशेष झाले.

माध्यमांच्या भूमिकेबाबत आपण विचारले म्हणून समाज हा माध्यमांचा सुद्धा आहे. एखाद्या सरकारी कर्मचार्‍याने त्याच्या कर्तव्याबाबत समाजाला उत्तरदायी असलेच पाहिजे, एखाद्या राजकीय नेत्याने त्याचे कर्तव्य नीट पार पाडलेच पाहिजे, न्यायपालिकेने डोळ्यावर पट्टी बांधून न्याय केलाच पाहिजे, असा आग्रह या तीन स्तंभांबाबत जितका टप्प्या-टप्प्याने लोकप्रिय आणि आग्रही झाला, तसा येणार्‍या काळात तो माध्यमांच्या बाबतीत सुद्धा होईल. पूर्वी नेता हा आपला भाग्यविधाता होता, आज तो जनतेचा सेवक आहे. तसेच माध्यमांनी सुद्धा व्यावसायिकतेच्या फुटपट्टीपलिकडे जात समाजाचे उत्तरदायित्त्व घेतले पाहिजे. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ खर्‍या अर्थाने खंबीरपणे उभा दिसला पाहिजे. तीन पायांची खाट खिळखिळीच होते, हे ऐतिहासिक सत्य आहे. या चारही स्तंभांची एक नाळ हीच समाजाला, देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल.

  • केतन पाठक
  • (हा लेख ‘सरकारनामा’च्या 2022च्या अंकात प्रकाशित)