पवारी खेळी


(24 एप्रिल 2012 रोजी प्रकाशित लेख)
अन्य कुठल्या पक्षाची असो वा नसो, राष्ट्रवादी काँग्रेसची 2014 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार आहे. एकिकडे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबतच राहण्याचे विधान करून राजकीय विश्लेषकांना गप्प बसण्यास सांगत असतानाच, राष्ट्रपतिपदासाठी मात्र निष्पक्ष उमेदवार देण्याचे आवाहन त्यांनी केले आणि एका दगडात दोन पक्षी मारले. असे काम पवारांसारख्या नेत्यांनीच करायचे असते. या देशाचे पंतप्रधानपद आपल्याला मिळावे, ही त्यांची महत्त्वाकांक्षा जुनीच आहे. काँग्रेसमध्ये राहून आपण हे पद प्राप्त करू शकणार नाही, याची जेव्हा त्यांना खात्री पटली, तेव्हाच ते तेथून बाहेर पडले आणि नवा पक्ष स्थापन करते झाले. काँग्रेसमध्ये नेत्यांची एक मोठी फौज त्याकाळी असताना, सोनिया गांधी अचानक पुढे आल्या. पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी एक चेहरा म्हणून केवळ त्या काँग्रेसला हव्या होत्या. यापेक्षा आणखी योगदान त्यांच्याकडून नको होते. पण, जेव्हा अचानक त्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येताना दिसून आल्या, तेव्हा पवारांचा श्वास कोंडला आणि त्यांना स्वदेशीचे स्मरण झाले. राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली. ज्यांना केंद्रातील सत्तेत मानाचे स्थान भूषवायचे होते, ते शरद पवार काही काळ पंतप्रधानपदापासून दूर फेकले गेले. पी. ए. संगमांची त्यांना साथ लाभली. 2014 ही कदाचित आपल्यासाठी अखेरची संधी असू शकते, असे त्यांना वाटत असल्याने त्यासाठी ते आटापिटा करीत असतील, तर त्यात चुकीचे काहीच नाही.


2014 च्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला संधी मिळतील, हे आज सांगता येणे कठीण आहे. पण, विद्यमान केंद्र सरकारविरोधात बर्‍यापैकी वातावरणनिर्मिती झाली आहे आणि यातूनही ते सत्तेत आले तर तो चमत्कारच म्हणावा लागेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे पवारांना दोन्ही आघाड्यांपासून समान अंतर राखण्याची सावध रणनीती खेळावी लागेल, हे निश्चित आहे. 2014 ची निवडणूक आम्ही काँग्रेससोबतच लढणार आहोत, हे विधान शरद पवारांनी करावे, यातील सर्वांत मोठा अर्थ तोच आहे. संपुआतून बाहेर पडण्याची घोषणा त्यांना करायची झाली तरी ते 2014 च्या निकालानंतर करतील. त्यापूर्वी ते संपुआचेच घटकपक्ष राहणार आहेत. पण, या सत्तांतरातील एक महत्त्वाचे केंद्र राष्ट्रपती भवन असेल, हेही त्यांना ठावूक आहे. काँग्रेसची राज्यातील सरकारे आणि केंद्रातील सरकारे संवैधानिक पदांवरील व्यक्तीच्या खेळीवर अधिक अवलंबून राहिली आहेत. विरोधी पक्षांची सरकारे राज्यपालांमार्फत अस्थिर करण्याची त्यांची जुनी सवय आहे. अशात 2014 मध्ये निकाल काहीही लागो, संधी आपल्यालाच मिळावी, असा प्रयत्न काँग्रेसचा असेल. त्यामुळे एखादा सोनियानिष्ठ या निवडणुकीत राष्ट्रपतिपदाचा उमेदवार असेल, हे ओळखून ते नाव पुढे येण्याआधीच सुरूंग लावण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे.


काँग्रेस पक्ष उमेदवार निश्चितीच्या प्रयत्नांत असताना निष्पक्ष उमेदवाराची निवड करण्याचा आग्रह हा पवारांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. सोनिया निष्ठ उमेदवाराचे नावही पुढे येऊ नये, म्हणून आतापासून जी मंडळी कामाला लागली, त्यात मुलायमसिंग यादव यांनी आघाडी घेतली. त्यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव पुढे केले. आता गैरराजकीय व्यक्ती या पदावर बसविण्याचा शरद पवार यांचाही आग्रह त्याच नावाचे सूतोवाच करतो. पवारांनी थेट कोणतेही नाव सूचविले नसले तरी मुलायमसिंग यादवांचाच सूर त्यांनी पुढे नेल्यासारखे वाटते. अशात पी. ए. संगमा यांचेही नाव पुढे करता आले असते, पण ते नाव राष्ट्रवादीपुरते मर्यादित करून त्यांनीच स्पष्ट नकार देऊन टाकला आहे. कुठल्याही स्थितीत सोनियानिष्ठ उमेदवार त्या पदावर बसणार नाही, हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न पवारांकडून होताना दिसून येतो. उत्तरप्रदेश निवडणुकीनंतर सपाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे त्यांनी पुढे केलेले नाव टाळणे सहजासहजी शक्य होणार नाही. विशेषत: अशा उमेदवाराचे, ज्यांच्या नावाला रालोआकडून चटकन होकार मिळेल. प्रतिभाताई पाटील यांच्यापूर्वी डॉ. कलाम हे भाजपाचेच उमेदवार होते आणि ते पाच वर्षे या देशाचे राष्ट्रपती सुद्धा होते, हे विसरून चालणार नाही.


तामिळनाडूत नव्याने जन्माला येणारे समीकरण, मुख्यमंत्र्यांच्या परिषदेच्या निमित्ताने मोदींसह अन्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या स्वतंत्र बैठका याचीही बर्‍यापैकी जाण शरद पवारांना आली आहे. त्यामुळे रालोआची सत्ता येत असल्याच्या स्थितीत आपले स्थान त्यात काय असेल, याचा आराखडा या नेत्याजवळ तयार नसेल, यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. पवारांच्या गेल्या काही दिवसांतील खेळीही त्याच दिशेने वाटचाल करीत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात पवारांनी भाजपाला सोबत घेऊन एक नवा पॅटर्न राबविला आणि बहुतेक जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपा युतीची सत्ता स्थापन केली. पवारांच्या काही निष्ठावान सहकार्‍यांमध्ये सुद्धा नवीन समीकरणांची चर्चा जोराने वाहत आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सोनिया गांधींना मात देण्याचा प्रयत्न ते करतील. त्याचाच श्रीगणेशा त्यांनी या विधानाने केला, असे म्हणायला अजीबात हरकत नाही. राष्ट्रपतिपदासाठी भाजपा किंवा काँग्रेस या दोन्हीपैकी एकाही आघाडीकडे बहुमत नाही. असे असतानाही एखाद्या व्यक्तीची अविरोध निवड होण्याची शक्यता अजीबात नाही. 2014 सर्वांच्या डोळ्यापुढे असल्याने संख्याबळाकडे पाहून माघार घेणेही कोणत्याच पक्षाला शक्य नाही. त्यामुळेच प्रादेशिक पक्षांचे मत या निवडणुकीत अतिशय महत्त्वाचे राहणार आहे.


अशात उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या पहिल्या दोन क्रमाकांच्या राज्यांतील सत्तेतील पक्ष जर डॉ. कलाम यांच्या नावाशी शिफारस करीत असतील तर काँग्रेसची फजिती अटळ आहे. डॉ. कलाम हे नाव पुन्हा पुढे आल्यास ते सोनिया गांधी यांच्यासाठी सर्वाधिक बोचरे नाव असेल. कारण, याच डॉ. कलाम यांची भेट घेतल्यानंतर सोनिया गांधी यांच्या अंतर्आत्म्याचा आवाज जागा झाला होता. तामिळनाडूत अण्णाद्रमुक सुद्धा आजघडीला भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील. डॉ. कलाम यांच्या नावाला विरोध करण्याचे धाडस सहजासहजी कुणी करणार नाही. कारण, ते कधीही कोणत्या पक्षात राहिले नाही. एक वैज्ञानिक म्हणून ते संपूर्ण भारतवासीयांचे चाहते आहेत. सत्तेच्या गणितात पक्के बसणारे हे नाव आहे. पवारांना ही खेळी करून सोनिया गांधींना मात द्यायची आहे. अन्न सुरक्षा विधेयकाला त्यांनी केलेला विरोध हा सर्वश्रूत आहे. पवारांच्या राजकारणाचे गेल्या काही दिवसांतील टप्पे पाहिले तर ते सोनिया गांधींच्या विरोधात वागत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा पवारांच्या सल्ल्याने न ठरता जेव्हा सोनियानिष्ठ आला, तेव्हापासूनच पवारांचा पवित्रा पूर्णत: बदललेला दिसून येतो. त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण जाणार पासून ते सर्वांत अकार्यक्षम मुख्यमंत्रीपर्यंतची सारी बिरूदे राष्ट्रवादीकडूनच मोठया प्रमाणात चिटकविली जात आहे. पवारांना काँग्रेसची साथ हवी आहे. पण, मान स्वत:कडे हवा आहे. तो प्राप्त होत नसल्यानेच त्यांनी ही खेळी केली. घोडामैदान जवळ आहे. जुलैत हा सामना रंगणार आहे. प्रतिभाताई महाराष्ट्रातूनच आल्या, त्यामुळे आता पुन्हा महाराष्ट्र नको, म्हणून सुशीलकुमार शिंदेंचाही पत्ता कापण्यात पवार पुढाकार घेतात, याचाच अर्थ आता त्यांना कोणत्याही स्थितीत सोनियानिष्ठ राष्ट्रपती नको. हा हट्टच त्यांच्या पुढच्या राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा आहे.