पहिलम् प्यारा…

(1 नोव्हेंबर 2014 रोजी प्रकाशित लेख)


अखेर तो दिवस उगवला. राज्याला नागपुरातून पहिला मुख्यमंत्री लाभला. भाजपाचा राज्यात प्रथमच मुख्यमंत्री होण्याचाही मान त्यांनाच मिळाला. विदर्भाला जवळजवळ 25 वर्षांनी मुख्यमंत्री लाभला. एक स्वच्छ, पारदर्शी, स्पष्टवक्ता आणि तितकाच लाघवी व्यक्तिमत्त्व लाभलेला हा नेता तसेही संपूर्ण नागपूरसाठी मानबिंदूच आहे. साधेपणा हा त्यांचा अंगीभूत गुण. एखादी गोष्ट होणार असेल तर ते लगेच ती करून देतील आणि होणार नसेल तर नकारही असा देतील की समोरच्याचे समाधान होईल. देवेंद्र फडणवीस यांच्याही आयुष्यातील हा अनोखा योग म्हणावा लागेल. नागपूर नगरीचा पहिला ‘मेअर इन कौन्सिल’ होण्याचा मान त्यांनी पटकाविला होता आणि नागपुरातून पहिला मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांनीच पटकाविला. राज्य मंत्रिमंडळातील त्यांचा हा प्रवेश थेट प्रमुखाच्या नात्याने व्हावा, हाही एक बहुमानच!


कुणी म्हणतील, साधे मंत्री म्हणूनही कधी काम न पाहिलेला हा नेता मुख्यमंत्री म्हणून यशस्वी कसा होणार? पण, महापौर म्हणून काम करताना त्यांनी महापौर कसा असावा, याची परिपाठीच घालून दिली होती. आमदार कसा असावा, याचीही मूर्ती त्यांनीच राज्य विधिमंडळात उभी केली. अतिशय अल्पावधीत सर्वोत्कृष्ट आमदाराचा पुरस्कार त्यांनी मिळविला. विधिमंडळ कामकाजाच्या नियमातील सारेच बारकावे त्यांना मुखोद्गत आहेत. याबाबत जेव्हाही त्यांना छेडले जाते, तेव्हा ते श्रेय स्व. गोपीनाथ मुंडेंना देतात. गोपीनाथजींना सभागृहात कोणताही विषय मांडायचा असला की ते नियम फडणवीसांना पाहण्यास सांगत. असे करता करता सारेच नियम त्यांना माहिती झाले आणि अतिशय हुशारीने त्याचा वापर त्यांनी राज्यापुढील प्रश्न सोडविण्यासाठी केला.


थोडक्यात सांगायचे तर अवघ्या भारतातून कमी वयाचा महापौर जर आदर्श घालून देऊ शकतो, पहिल्यांदाच आमदार होणारी व्यक्ती जर राष्ट्रकुल संसदीय पुरस्काराची मानकरी होऊ शकते, तर ती व्यक्ती थेट मुख्यमंत्री होतानाही यशस्वी होतानाच दिसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण घेऊ. ते एक प्रचारक होते. त्यांनी नगरसेवकपदाचीही निवडणूक लढविली नव्हती आणि आमदारही नव्हते. पण, आमदार आणि मुख्यमंत्री अशी दोन्ही सूत्रे त्यांनी एकाच दिवशी स्वीकारली आणि आज सर्वाधिक यशस्वी मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. दिल्लीच्या राजकारणात ते थेट पंतप्रधान म्हणूनच रूजू झाले आणि यशस्वी पंतप्रधानांच्या मांदियाळीत सुद्धा अग्रस्थानी तेच राहतील, यात शंका नाही.


देवेंद्र फडणवीस हे कामाचे काटेकोर. 15 वर्ष आमदार असतानाही आपण खूप मोठे नेते झालोत, याचा त्यांनी कधी आव आणला नाही. वागणुकीत तोच साधेपणा आणि प्रत्येकाशी त्या व्यक्तीलाही सन्मान आहे, याचे भान ठेऊनच ते नेहमी वागतात. कार्यक्रमाला वेळेत पोहोचणे हा त्यांचा दंडक. कोणताही कागद डोळ्याखालून गेल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्या कामात अचूकतेकडे त्यांचा कल असतो. त्यासाठी अतोनात परिश्रम घेण्याचीही त्यांची तयारी असते. व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी त्यांनी कित्येक रात्री जागून काढल्या. त्यांच्या समग्र चिंतनाचा तो एक बोलका पुरावाच. रात्री त्या विषयातील तज्ञांशीही ते बोलत असत. देशाचे आणि राज्याचे आर्थिक सर्वेक्षण हे त्यांचे आवडते अस्त्र. प्रत्येक विषयाचा त्यातून अभ्यास करायचा आणि त्यावर पोटतिडकीने चिंतन करून समाधान शोधायचे, हे त्यांच्या कल्पकतेला अगदी सहज जमतं. सलग तीन महिने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला ते लागले होते. जणू ही निवडणूकच त्यांनी अंगावर घेतली होती.


सामान्य माणूस असता तर मुख्यमंत्रीपदाची स्वप्न त्याने जरूर रंगविली असती. पण फडणवीस त्या स्वप्नामध्ये कधीच रमले नाही. प्रदेशाध्यक्ष या नात्याने मला भाजपाची एकहाती सत्ता महाराष्ट्रात स्थापित करायची आहे, हे त्यांचे ध्येय होते आणि ते त्यांनी बर्‍याच अंशी पूर्ण करून दाखविले. संसदीय मंडळच मुख्यमंत्री ठरवेल, हे त्यांचे वाक्य केवळ टीव्हीवर मुलाखती देण्यापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्या निकटवर्तियांनाही ते हेच सांगत. तिकीट वाटप असो, की प्रचारासाठीची जुळवाजुळव कोणतेही नियोजन त्यांनी स्वत:ला मुख्यमंत्रीपदी ठेऊन केलेले नव्हते. केले ते केवळ भाजपाच्या सत्तास्थापनेसाठी.


पाहता पाहता प्रचाराचा काळ जवळ येऊन ठेपला. त्यांनीही आपल्या कामाची गती वाढविली. स्वत: रिंगणात असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना आधीच सांगितले, ‘मी तीन तास तुम्हाला देईन, बाकी मतदारसंघ तुम्ही सांभाळायचा.’ सकाळी सात वाजता उठून साडेसातपर्यंत फडणवीस बाहेर पडत. साडेदहापर्यंतचा वेळ पदयात्रा, भेटीगाठींना दिला की, रॅली संपेल, त्याच ठिकाणाहून त्यांच्या वाहनाने थेट विमानतळाचा रस्ता धरलेला असायचा. प्रचंड गरमी, संपूर्ण अंग ओले होईल, अशा गरमीत हेलिकॉप्टरने त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले. दररोज सहा सभा ते घ्यायचे. रात्री 10 वाजता शेवटची सभा संपली की, पुन्हा विमान मुंबईकडे. मुंबईतून संपूर्ण राज्याचा आढावा घेणे, प्रचारसाहित्य पोहोचले काय, कुठे कुणाला मदतीसाठी मनधरणी करायची आहे काय, कोणत्या भागात आपण कमी पडतो आहोत, याची पुरेपूर माहिती ते घेत असत आणि उमेदवाराला देतही असत. उमेदवाराला धीर देणे, त्याच्यात आत्मविश्वास भरणे ही कामे अगदी लिलया त्यांनी केली. हेलिकॉप्टरच्या 15 ते 20 मिनिटांचा प्रवासाचा वेळही त्यांनी कधीच वाया घालविला नाही. त्या काळात आलेल्या एसएमएस किंवा संदेशांना उत्तरे देण्यासाठी ते वेळ देत. प्रदेशाध्यक्षांकडून आलेल्या एका एसएमएसने कार्यकर्तेही मग जोमाने काम करीत.


दररोज साधारणत: फोन, एसएमएस, संदेशातून ते तीन हजार लोकांच्या संपर्कात राहत होते. राज्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, आप्त आपल्या संदेशाला उत्तर कधी पहाटे 4 वाजता तर कधी मध्यरात्री 2 वाजता आलेले पहायचे, तेव्हा तेही थक्क होऊन जात. दरम्यानच्या काळात त्यांची दूरध्वनीवरील उपलब्धता कमी झाल्याची टीका झाली होती. लोक गैरसमज करायला कधीही मागे पाहत नाहीत. पण, मोबाईलच्या दोन ते तीन बॅटरी किती लवकर संपतात, हे त्यांच्या आप्तांना चांगलेच ठावूक आहे. पण एसएमएसला उत्तर गेले नाही, असा एकही दिवस आणि एकही व्यक्ती आढळणार नाही. एकदा अ‍ॅड. उद्य डबले तासभर त्यांच्यासोबत कारमध्ये प्रवास करते झाले. त्यानंतर त्यांनी कानाला खडा लावला. आता मी देवेंद्रजींना फोन करणार नाही, एसएमएस टाकून ठेवीन, हा निर्धारच त्यांनी केला.


फडणवीस अतिशय साधे. जेवणाच्या विशेष आवडी नाहीत. मिळेल ते खायचे आणि काम करायचे, हा त्यांचा दंडक. निवडणुकीच्या काळात कधीही जेवणासाठी ते कुठे थांबले नाही. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाताना जो काय 15 मिनिटांचा काळ हेलिकॉप्टरमध्ये मिळायचा, तोच वेळ जेवणाचा. त्यातही कोरडी भाजी असेल तर खाणे व्हायचे, अन्यथा पुढच्या सभेच्या ठिकाणची तयारी. त्या भागातील प्रश्न, त्या भागातील समस्या याचा मुद्देसुद अभ्यास करूनच तेेथे भाषण द्यायला ते जायचे. अनंत अडचणी मार्गात होत्या. पण, सतत हसतमुख आणि कोणतीही तक्रार न करता काम करणारा हा नेताच निराळा. हेलकावे खाणार्‍या हेलिकॉप्टरमध्ये कोरडेच अन्न लागते. ते न मिळाले तरी त्यांनी कधी कार्यकर्त्यांकडे तक्रार केली नाही. उलट सोबतचा कार्यकर्ता उपाशी आहे, याचीच चिंता त्यांना अधिक असायची. एक मात्र नक्की की दिवसभरातील जी कामे सकाळी ठरविली असतील ती त्याच दिवशी झाली पाहिजे. शेवटचे काम आटोपले की नंतरच झोपेसाठी वेळ द्यायची. मग ते पहाटेचे कितीही वाजलेले असोत.


फडणवीसांचा सर्वांत मोठा गुण कोणता असेल तर तो अभ्यास. प्रत्येक गोष्ट नव्याने शिकण्याची उमेद कायम आहे. त्याचमुळे ते कदाचित विनयशील असावे. आपले ज्ञान सातत्याने वृद्धींगत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे असे कितीतरी विषय असतील किंवा कितीतरी लोक, ज्यांची एक साखळीच तयार झाली आहे. फडणवीस हे नाव उच्चारताच मदत करणार्‍यांची रीघ लागते. कोणीतरी आपल्या ज्ञानाच्या, प्रामाणिकतेच्या, कर्तव्याच्या जोरावर समाजासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करतोय्, हे म्हटले की लोक आपोआप धावून येतात.


फडणवीसांना आमदारकीची 15 वर्ष झाली. खरे तर या काळात नेत्यांचे कितीतरी व्यवसाय उभे राहतात. पण फडणवीस त्याला अपवाद. त्यांचा कुठलाही व्यवसाय नाही. समाजकार्य हे एकच ध्येय आणि तेच एक कर्तव्य. खरे तर फडणवीसांची राजकीय उंची वाढत असतानाच त्यांचा विवाह झाला. पण कुठेही वैवाहिक जीवनाची पर्वा न करता पक्ष आणि समाजासाठी ते झटत राहिले. दिविजा हे कन्यारत्न झाले. घरातील भींती चित्रांनी रंगविण्यात दिविजाचे बालपण जात असताना देवेंद्र फडणवीस मात्र झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासाठी विधानसभेत भांडत असायचे. नझुल, वीज, अर्थसंकल्प हे त्यांचे आवडते विषय. म्हणूनच पुरवणी मागण्यांवरील चर्चेत अभ्यासपूर्ण भाषण असायचे ते फडणवीसांचेच. आजही अर्थसंकल्पावरील त्यांचे भाषण दरवर्षी ऐकणारा नागपुरात मोठा वर्ग आहे. नागपूरची भारनियमनमुक्ती त्यांच्याचमुळे झाली. एवढेच काय, राज्यातील आघाडी सरकारचे एकेक करीत घोटाळे बाहेर काढत त्यांनी वाभाडे काढले. पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि ते प्रदेशाध्यक्ष बनले. अतिशय लहान वयात आंतरराष्ट्रीय पातळीवर हवामानातील बदल, पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग अशा विषयांवर भारताचे प्रतिनिधीत्त्व करण्याची संधी त्यांना मिळत गेली. भाजयुमोत त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काम केले. संघटनकौशल्य हा त्यांचा अंगीभूत गुण.


आज दिल्लीत नरेंद्र मोदींच्या रूपाने एक चेहरा देशभरातील जनतेच्या आकांक्षांना पुनरूज्जीवित करीत असताना महाराष्ट्रात सुद्धा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या रूपाने लाभला आहे. ही एक मोठीच उपलब्धी म्हणावी लागेल. राजकारणाच्या परिभाषा आता बदलतील आणि मोठ्या प्रमाणात स्वच्छ चारित्र्याचे लोक राजकारणात आपले आसन निश्चित करतील, अशी आशा करू या! आपल्या मायभूसाठी हा दिवस सुदिन असेल, यात शंका नाही.