भाजपाचे आणि नागपूरचेही पहिले मुख्यमंत्री

(1 नोव्हेंबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली मुलाखत)

वडीलांचा आदर्श अन् 25 वर्षांचा अविरत संघर्ष
एक सामान्य कार्यकर्ता अशीच नवीन मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांची ओळख. राजकारणातील आदर्श स्व. गंगाधरराव फडणवीस अर्थात पिता. समाजकारणाचे बाळकडू घरातच मिळालेले. आणिबाणीच्या काळात आपल्या वडिलांना कारागृहात कुणी टाकले तर ते काँग्रेसने, हा बालमनावर झालेला आघात. त्यामुळे इंदिरा कॉन्व्हेंटमध्येही प्रवेश घेण्यास त्यांच्या बालमनाने दिलेला नकार. काहीही ध्यानीमनी नसताना अचानक भाजपामध्ये प्रवेश झाला आणि आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी झाला.


सुमारे 25 वर्ष एक सामान्य कार्यकर्ता म्हणून भाजपामध्ये काम करणारे फडणवीस आज मुख्यमंत्री झाले आणि योगायोग पहा बरोबर 25 वर्षांनी विदर्भाला मुख्यमंत्रीपद मिळाले. खरे तर विदर्भाला मिळणार्‍या या मुख्यमंत्र्याची पाळेमुळे 25 वर्षांपूर्वीच रोवली गेली होती. यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण या पंक्तीत महाराष्ट्राचे ते 23 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. वयाच्या 22 व्या वर्षी नगरसेवक, 27 व्या वर्षी महापौर होणारे फडणवीस वयाच्या 44 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. विदर्भातून तिसरे मुख्यमंत्री झालेले फडणवीस हे नागपुरातून मुख्यमंत्री झालेले पहिले आहेत. शिवाय, राज्यातून भाजपाचेही पहिले मुख्यमंत्री होण्याचेही भाग्य त्यांनाच मिळाले आहे.


नवीन मुख्यमंत्र्यांचे तरुण भारतच्या वतीने अभिनंदन केल्यानंतर जुन्या काळात रमताना ते म्हणाले, राजकारणात यायचे नाही, असा निर्णयच आपण घेतला होता. पण परिस्थितीमुळे यावे लागले. मला अ. भा. विद्यार्थी परिषदेत पूर्ण वेळ काम करायचे होते. पण अचानक एके दिवशी स्व. प्रा. विलासजी फडणवीस म्हणाले, तुला आता भाजपात काम करायचे आहे. विलासजी तेव्हा प्रांत प्रचारक होते. नकाराचा प्रश्नच उद्भवत नव्हता. 1989 सालची ही गोष्ट असेल.


‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अशी प्रतिमा असलेल्या फडणवीसांना साधे राहणे आणि सर्वांमध्ये मिसळणे अतिशय आवडते. खाण्यावर त्यांचे प्रेम. त्यातही गरमागरम पोहे त्यांच्या आवडीचे. अनेकदा उपवास सुद्धा पोह्यांवर सोडणे त्यांना आवडते. सगळे छंदही सामान्य तरुणांसारखेच. हिंदी चित्रपटातील गीतं त्यांना अतिशय आवडतात. त्यातल्या त्यात अ‍ॅक्शनपट सर्वाधिक आवडतात. विनोदी चित्रपटांनाही त्यांचे प्राधान्य असते. हिंदी गाणे ऐकताना त्यात जुनी आणि नवीन असा संगम असतो. किमान 2000 गाणी त्यांना पाठ आहेत. अमृता फडणवीस अर्थात त्यांच्या पत्नी या त्यांच्या आवडत्या गायिका. अभिनेत्यांमध्ये त्यांना पूर्वीच्या काळात डोकावले तर विनोद खन्ना, अमिताभ बच्चन आवडायचे आणि अगदी अलीकडच्या काळात रणबीर कपूर. रेखा ही जुन्या काळची आणि प्रियंका चोपडा ही अलीकडची अभिनेत्री त्यांच्या आवडीची.


राजकारणानेच त्यांना संघर्ष करायलाही शिकविले. ते म्हणतात, ‘एकदा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. त्या काळात आमच्या ताब्यातील नागपूर महापालिकेला त्रास देण्याचा उद्योग त्यांनी केला. 2001 साली मी अगदीच नवीन आमदार होतो. प्रश्न उपस्थित केले की दडपण्याचा प्रकार व्हायचा. पण वकिलीचे ज्ञान असल्याने लढा न्यायालयापर्यंत नेला. तेथे जिंकलो. त्यातून पक्का होत गेलो.


वडील हेच माझे राजकारणातील आदर्श. ते संघाचे प्रचारकही होते, जनसंघातही त्यांनी काम केले आणि नंतर उपमहापौर म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या निधनानंतर त्या जागेवरून आमचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी निवडणूक लढविली. माझ्या वडिलांच्या निधनानंतर विधानपरिषदेत श्रद्धांजलीपर भाषणं झाली, तेव्हा शरद पवारांनी ‘विधानपरिषदेतील वाघ गेला’, अशी श्रद्धांजली त्यांना अर्पण केली होती.’


नवीन मुख्यमंत्र्यांना क्रिकेट, बास्केटबॉल, हॉकी, टेबलटेनिस, फुटबॉल असे सारे खेळ आवडतात. ते त्यावर म्हणतात, यापैकी एकही खेळ आपण खेळलो नाही. पण बास्केटबॉलच्या उद्घाटनाला जायचो, तेव्हा बॉल मात्र बास्केटमध्ये जायचा, तेव्हा हायसे वाटायचे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता या बँकर आहेत. लग्न होऊन त्या फडणवीसांच्या घरी आल्या तेव्हा आमदार म्हणजे काय, ते त्यांना ठावूक नव्हते. पण, 2014 च्या निवडणुकीत अमृता यांनी प्रत्यक्ष प्रचारात भाग घेतला, याचा त्यांना मोठा आनंद आहे. त्यांची मुलगी दिविजा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फॅन आहे. मोदींची भाषणं ती दूरचित्रवाहिन्यांवर आवर्जून ऐकते.